'भारत जोडो यात्रा' चव्हाण, पाटील, कदमांची हवा.. शिंदे, पृथ्वीराजबाबा अहिस्ता-अहिस्ता

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी काय कमावले.. काय गमावले?
bharat jodo yatra Latest News
bharat jodo yatra Latest NewsSarkarnama

विकास देशमुख

पुणे : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला तेलंगणातून महाराष्ट्रात आली. सावरकरांच्या मुद्यावरून ऐन थंडीत वातावरण तापवून ती मध्यप्रदेशात गेलीही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तिला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून कार्यकर्ते, नेते यांची छाती ५६ इंचांची झाली. त्यांच्यात आत्मविश्वास आला.

राज्यात निद्रिस्त असलेल्या काँग्रेसला या यात्रेमुळे ऊर्जा मिळेल, की नाही हे २०२४ च्या निवडणुकांनंतरच कळेल. पण, तिच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली. त्यांचा उत्साह वाढला. आजही लोक आपल्या पाठीशी आहेत, हे त्यांना दिसून आले. त्याचा फायदा पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत काही प्रमाणात होऊ शकतो. त्यांची मताची टक्केवारीही वाढू शकते. जनमानसात महागाईवरून भाजपमध्ये असलेला रोष काँग्रेससाठी फायद्याचा ठरू शकतो, हे या यात्रेत देगलूर ते वाशीम असा प्रवास करताना दिसून आले. शिवाय इतरही काही गोष्टी जाणवल्या. त्याच्या या ठळक नोंदी.

bharat jodo yatra Latest News
फडणविसांनी एकनाथ शिंदेंना फुगवले... आणि त्यांनी उद्धवजींवर सूड घेतला...

राहुल गांधी यांच्या प्रतिमेत झाला बदल

राहुल गांधी म्हणजे गांभीर्य नसलेले नेते, राहुल गांधी म्हणजे राजकीय घराणेशाहीचे मूर्तिमंत उदाहरण, राहुल गांधी म्हणजे काहीच अभ्यास नसलेला ‘पप्पू’, अशीच आजपर्यंत राहुल यांची प्रतिमा होती. राहुल गांधींना पक्षाचे काहीच घेणे-देणे नाही, असेही त्यांच्याच पक्षाचे काही कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलत होते. पण, आता हेच राहुल गांधी त्यांना पक्षाचे तारणहार वाटायला लागले. अभ्यासू, परिपक्व नेते वाटायला लागले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण अन् राजकारण-समाजकारण याचे भान असलेला नेता वाटायला लागले.

राहुल गांधी यांचे विरोधकही आता त्यांची पप्पू म्हणून हिणवणी करणे टाळत आहेत. हे शक्य झाले ते सध्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे. एक जबाबदार राष्ट्रीय नेता म्हणून त्यांची प्रतिमा या यात्रेने तयार झाली. शिवाय कुठे काय बोलायचे याचे कसबही राहुल यांनी अवगत केल्याचे या यात्रेतून दिसून आले.

bharat jodo yatra Latest News
पवारांच्या आपुलकीने कार्यकर्ता भारावला; विमानाने पोहचवले घरी

महाराष्ट्रात देगलूरपासून ते वाशीमपर्यंत या यात्रेला राष्ट्रीय माध्यमांनी अव्हेरले होते. पण, वाशीमपासून या यात्रेची त्यांना दखल घ्यावीच लागली. इतकेच काय, तर शेगावची सभाही राष्ट्रीय माध्यमांनी लाइव्ह दाखवली. त्याला कारण होते ते राहुल यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे. तसे पाहिले तर राहुल हे यात्रेच्या सुरुवातीपासूनच सावरकर आणि आरएसएसवर टीका करीत आले.

नांदेड-हिंगोली जिल्ह्यातील काही कोपरा सभेतही त्यांनी सावरकर आणि आरएसएसवर टीका केली. पण, त्या टीकेला धार नव्हती. यात्रा हिंगोली जिल्ह्यातून वाशीममध्ये आल्यानंतर मात्र त्यांनी सावरकर आणि आरएसएसवर जोरदार हल्ला केला.

वाशीमचा आजवरचा इतिहास पाहिला तर वाशीम शहर आणि वाशीम विधानसभा मतदारसंघ मागील ३० वर्षांपासून भाजपला अनुकूल राहिलेला आहे. हा मतदारसंघ भाजपचा नव्हे तर संघाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच बाल्लेकिल्ल्यात संघ, कट्टर हिंदुत्ववादी यांचे प्रेरणास्थान असलेल्या सावरकरांवर राहुल यांनी टीका करून आपल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. ती त्यांची रणनीती असावी, त्यांनी ते ठरवून केलेले असावे, असेच यातून दिसते. काहीही असो, यापूर्वी माध्यमे, सोशल मीडिया यांनी राहुल यांची जी प्रतिमा रंगवली होती त्या प्रतिमेत या यात्रेनिमित्त मोठा बदल झाला. एक अभ्यासू नेते म्हणून राहुल पुढे आले.

bharat jodo yatra Latest News
एकनाथ शिंदेंच्या रुपाने भाजप नेत्यांच्या डोक्यात पुढची गणिते! फडणवीस दिल्लीत गेले तर....

याच मुद्द्यांवर राहुल यांचा भर

यात्रेत राहुल यांनी महागाई, बेरोजगारी, शिक्षण, जीएसटी, नोटाबंदी, धार्मिक धृवीकरण करून निर्माण केली जाणारी भीती, शेतकऱ्यांचे उत्पन्न या मुद्द्यांवर भर दिला. प्रत्येक सभेत याच मुद्द्यांचे ते विश्लेषण करीत होते. विशेष म्हणजे, यात्रेचे नाव जरी भारत जोडो असले तरीही राहुल यांनी आपल्या प्रत्येक भाषणात ‘हिंदुस्थान’ हाच शब्द वापरला. त्यांनी ‘भारत’ म्हणणे टाळले. यातही त्यांचे धोरण दिसून आले.

हे आहे मोठे अपयश

‘मी द्वेष मिटवला अन् प्रेम वाटायला आलो’, असे राहुल यांनी आपल्या प्रत्येक भाषणात सांगितले. पण, त्यांचे कार्यकर्ते, नेते एकमेकांचा द्वेष करतात. त्यांच्यातच वर्चस्वावरून वैर आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. हा द्वेष ही यात्राही मिटवू शकली नाही, हे तिचे मोठे अपयश आहे.

काँग्रेस पक्ष गटबाजीने पोखरला आहे, याचीच प्रचिती या यात्रेतही वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यात आली. नांदेड जिल्ह्यातून यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच जागोजागी लावण्यात आलेल्या स्वागत फलकांवर गटबाजी दिसून आली. परभणी-हिंगोली जिल्ह्यातील नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी अनेक ठिकाणी स्वागत फलक लावले होते. पण, हिंगोली जिल्ह्यातील आमदार प्रज्ञा सातव यांचे छायाचित्र स्वागत फलकावर लावलेले नव्हते. त्यानंतर हा मुद्दा काही कार्यकर्त्यांनी उचलून धरला. त्यामुळे हत्तीअंबिरे यांनी काही स्वागत फलक नव्याने छापून त्यावर आमदार सातव यांचे छायाचित्र घेतले. पण, त्यांची संख्या कमी होती. या फलकावरून काँग्रेसची गटबाजी अधोरेखित झाली.

हिंगोली जिल्ह्यातच ज्येष्ठ नेते भाऊराव पाटील गोरेगावकर आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यातही एकमत नसल्याचे दिसून आले. त्यापूर्वी नांदेड जिल्ह्यात लातूरचे अमित देशमुख, धीरज देशमुख दिसले नाहीत. ते नांदेडमध्ये का नव्हते, त्यांचे आणि चव्हाणांचे काही बिनसले का, अशी चर्चा ऐकायला मिळाली. पुढे वाशीम जिल्ह्यात ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख आणि आमदार अमित झनक यांची गटबाजी दिसून आली. आज देशमुख हे पक्षात अधिकृत नसले तर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका गटाचे ते नेतृत्व करतात. त्यांच्या गटाचे राजेभाऊ चौधरी आणि इतर कार्यकर्त्यांचा या यात्रेत सक्रिय सहभाग दिसून आला. त्यामुळे वाशीममध्ये काँग्रेसचे दोन तुकडे पडलेले आहेत, हे भारत यात्रींनी पाहिले. हे दोन तुकडे राहुल जोडू शकले नाहीत. त्यांच्यातील एकमेकांची ‘नफरत’ संपवू शकले नाहीत, हे यात्रेचे मोठे अपयश आहे.

अशोक चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम यांची हवा

या यात्रेत हवा झाली ती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांची. अशोक चव्हाण यांनी या यात्रेनिमित्त जणू शक्तिप्रदर्शनच केले. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस म्हणजे सबकुछ अशोक चव्हाण असे वातावरण करण्यास अशोकराव यशस्वी झाले.

कृष्णूर येथील कोपरा सभा आणि नांदेड शहरातील सभेला लाखोंची गर्दी जमली होती. यात अशोकरावांनी स्वतःची हवा करून घेतली. त्यांच्यासह देगलूरपासून होते ते कोल्हापूरचे आमदार पाटील आणि पलूस कडेगावचे आमदार कदम. या दोन्ही आमदार द्वयांनी आपल्या मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते आणले होते. भगवे फेटे, टीशर्ट, कुस्ती यातून ते वेगळे दिसत होते. हे कार्यकर्ते वाहनांतून नव्हे तर पायी या यात्रेत देगलूरपासून सहभागी झाले. त्यामुळे पाटील आणि कदम आपल्याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाले. भविष्यात त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी येऊ शकते, याचे संकेत यातून मिळाले.

सुशीलकुमार शिंदे वेगात; पृथ्वीराज चव्हाण ‘आहिस्ता-आहिस्ता’

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हेही यात्रेत सहभागी होते. शिंदे यांचा सहभाग उत्स्फूर्त दिसून आला. ते काहीच किमी पण 'वेगात' चालत होते. त्याचवेळी पृथ्वीराज चव्हाण यात्रेच्या मागे वाहनात बसून येत होते. व्यासपीठावरही त्यांची पावले ‘आहिस्ता-आहिस्ता’, ‘सांभाळून’ असल्याचे जाणवले. शिंदे यांच्या कन्या प्रणिती या देगलूरपासून वाशीमपर्यंत चालताना दिसल्या. त्यातून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांची निष्ठा दिसून आली. पण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध भूमिका का घेतली हे कळाले नाही. त्यांच्या भूमिकेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतात.

मोठ्या नेत्यांचा साधेपणा

या यात्रेचा कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी होते. कार्यकर्त्यांसोबत ते पायी चालले. त्यांच्या ताटाला ताट लावून जेवले. ज्यांना पायी चालणे शक्य नव्हते. ते वाहनात होते. पण, चालून चालून झालेल्यांना त्यांनी आपल्या वाहनातून लिफ्ट दिली. त्यांचा हा साधेपणा भावला.

साहित्यिक, कलावंतांची मदत

ही यात्रा राजकीय नाही. ती धर्मांध शक्तीच्या विरोधात आहे अशी भूमिका घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्ते या यात्रेत आंदोलन म्हणून सहभागी झाले होते. अडिचशे साहित्यिकांनीही या यात्रेला पाठिंबा दिला. राहुल यांच्याशी चर्चा केली. सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, कलावंत, साहित्यिक हे राजकारणापासून दूर असतात. पण, समाजावर त्यांचे विचार, भूमिका प्रभाव करतात. हे हेरून कॉंग्रेस त्यांना जोडत आहे. भाजप विरोधात त्यांची मदत घेत आहे. हे यातून अधोरेखित झाले. यातूनच 'लोकायत' ही भूमिका घेऊन चालणारी कलावंत युवकांची संघटनाही आता पूर्णवेळ कॉंग्रेससोबत आहे. 'लोकायत'च्या तरुण-तरुणींनी यात्रेत क्रांतिगीते, स्फूर्तिगीते गाऊन रंगत आणली. थोडक्यात पक्ष आपल्या संघटनेत बदल करत असून, विचार करणारे आणि भूमिका घेणारे कार्यकर्ते, नेते तयार करीत आहे.

(लेखकाने या यात्रेत देगलूर ते वाशीम असा प्रवास केला आहे.)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com