Traders Appose Maharashtra Band Sarkarnama
मराठवाडा

बंदला व्यापाऱ्यांचा विरोध ; म्हणाले, धंदे करू द्या, मोदी- ठाकरे काही आणून देणार नाहीत!

(Traders appose Maharashtra Band) तुम्ही इथून निघून जा, आम्ही दुकान बंद ठेवणार नाही. बंदचे आवाहन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला काही आणून देणार नाहीत, आणि मोदीही

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मुंबईसह संपुर्ण राज्यात या बंद वरून मतभेद होते. व्यापारी या बंदसाठी उत्सूक नसतांना हा बंद लादण्यात आला. परिणामी अनेक ठिकाणी बंदचे आवाहन करणारे कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्यात वादावादीच्या घटना घटल्या.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार दिला, तर शहरातील औरंगपुरा भागात व्यापारी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे पहायला मिळाले. आता कुठे व्यवहार सुरळीत होत आहेत, सणासुदीत लोक खरेदीसाठी बाहेर पडले तर तुम्ही दुकाने बंद करायला सांगतायेत. जा आम्हाला धंदे करू द्या, उद्धव ठाकरे किंवा मोदी आम्हाला काही आणून देणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी नोंदवल्या आहेत.

लखीमपूर खिरी येथे शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने हा घृणास्पद प्रकार केल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व त्यांच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या बंदमध्ये शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेना, काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन केले. काही ठिकाणी लोकांनी त्यांचा मान राखत दुकान बंद ठेवले, पण त्यांची पाठ फिरताच दुकाने पुन्हा उघडली.

काही ठिकाणी व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे देखील पहायला मिळाले. शहरातील औरंगपुरा या प्रमुख बाजारपेठेत महिला कार्यकर्त्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होत्या. त्यावेळी एका व्यापाऱ्याने या महिलांना सुनावले, आम्हाला कामधंदा करू द्या, आधीच कोरोनाच्या संकटाने आमचे कंबरडे मोडले आहे.

आताकुठे सणासुदीत सावरण्याची संधी आहे, तर तुम्ही बंद करायला लावतायेत. तुम्ही इथून निघून जा, आम्ही दुकान बंद ठेवणार नाही. बंदचे आवाहन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला काही आणून देणार नाहीत, आणि मोदीही, असा संताप या व्यापाऱ्याने व्यक्त केला. शहरात अनेक ठिकाणी असेच चित्र होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT