Naigaon Assembly Constituency news Sarkarnama
मराठवाडा

Naigaon Assembly Constituency : मतदारसंघाची बकाल अवस्था करणाऱ्यांना घरी बसवा!

Don't give another chance to those who mislead the constituency : महायुतीमधील आमदार सगळ्या योजना सोडून फक्त तीर्थक्षेत्र दर्शन योजनेवरच भर देतात. याचा अर्थ त्यांच्या इतर योजना प्रभावी नाहीत. योजनांवर भर दिला असता तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : नायगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार कोटींची विकासकामे केल्याचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात मात्र बकाल अवस्था आहे. लोकांना देवदर्शन घडवून आणले म्हणजे विकास म्हणायचे का? शेतमालाला भाव नाही. रस्ते, पाणी, वीज, रोजगाराच्या गंभीर प्रश्नांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी बगल दिली आहे, अशी टीका नायगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. मीनल निरंजन पाटील खतगावकर यांनी केली.

मतदारसंघातील व्हिजन, भूमिका यासोबतच पक्षांतरामुळे विरोधकांकडून झालेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. गावागावांत मूलभूत समस्या आहेत. (Mahavikas Aghadi) छोट्या समस्येपासून मोठे स‍िंचनासारखे प्रकल्प दहा वर्षांत झाले नाहीत. प्रलंबित प्रकल्पावरही शासन सकारात्मक काही करताना दिसत नाही. या गोष्टींवर काम करायचे आहे. पाणंद रस्त्यांचा विकास, सिंचनाच्या सुविधा, विजेच्या अडचणी या गोष्टींवर लक्ष दिले तरच आपल्या कृषी क्षेत्रात चांगले काम करता येईल.

कृष्णूर औद्योगिक वसाहतीत बंद असलेले उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. रोजगार निर्माण होत नाही. धर्माबाद तालुक्यातही नागरिकांची औद्योगिक वसाहतीत एखादा प्रकल्प आला पाहिजे, अशी मागणी आहे. (Congress) महिलांच्या दृष्टीने तेलंगणा, कर्नाटकच्या धर्तीवर उद्योगाच्या माध्यमातून सक्षमीकरणावर भर दिला जाणार, असल्याचे खतगावकर यांनी सांगितले. विद्यमान आमदारांनी काय कामे केलीत, याचे उत्तर त्यांनीच द्यावे.

महायुतीमधील आमदार सगळ्या योजना सोडून फक्त तीर्थक्षेत्र दर्शन योजनेवरच भर देतात. याचा अर्थ त्यांच्या इतर योजना प्रभावी नाहीत. योजनांवर भर दिला असता तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते. ग्रामीण भागातील मतदारांवर दबाव आणून मला मतदान द्या, हे बरोबर वाटत नाही, अशी टीका मीनल खतगावकर यांनी केली. महाविकास आघाडीच्या काळात आठ ते नऊ हजार रुपये सोयाबीनला भाव होता. आज चार हजार रुपये भाव मिळतो. आपल्या भागात सोयाबीन व दुसरा कापूस उत्पादक शेतकरी आहे.

कापसाला 12 ते 15 हजार भाव देणार म्हणून घोषणा केली. आज सहा हजार रुपयेही भाव नाही. खताचा तुटवडा असून तेलंगणातून ते आणावे लागत आहे. आमची शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका असून संधी मिळाल्यानंतर हा प्रश्न शासन स्तरावर मांडणार आहे. अकोला-संगारेड्डी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला आहे. मात्र, नांदेड ते देगलूर असा 85 किलोमीटर एवढाच भाग प्रलंबित आहे. हा प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे गरजेचे आहे. हा पूर्ण झाल्यास अर्थकारणाचा कायापालट होईल.

तसेच, नांदेड-नायगाव-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भूमिका घेतलेली आहे. बोधनपासून लातूरकडे जाणारा रेल्वेचा एक मार्ग प्रस्तावित आहे. हे प्रकल्प मार्गी लागल्यास विकासाला चालना मिळेल, असेही खतगावकर म्हणाल्या. जल जीवनच्या नावाखाली गावातील अंतर्गत रस्ते उखडून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांच्या नावावर कामे सुरू आहेत, पुनर्वसनाच्या नावावर फार मोठा निधी आणण्यात आला.

परंतु, गावातील सरपंचालाही विश्वासात न घेता गुत्तेदारांना हाताशी धरून स्वत:चे आर्थ‍िक हित साधण्यात येत आहे. आम्हाला विश्वासात न घेता पुनर्वसनाच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा सरपंचांचा आमदारांवर आरोप आहे. धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी व उमरी तालुक्यातील नागठाणा येथे विद्यमान आमदारांनी कोटींची कामे केली. मात्र, मंगनाळीचा रस्ता पंधरा, तर नागठाण्याचा रस्ता दीड महिन्यात उखडून गेला. त्यांनी काय विकास केला, हे स्पष्टच आहे, अशी टीकाही मीनल खतगावकर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT