Raosaheb Danve-Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : आधी दानवेंच्या तर आता मंत्री सत्तार यांच्याविरोधात सिल्लोडमध्ये मोर्चा

Jagdish Pansare

Shivsena v/s BJP Politics News : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे विद्यमान अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच चालला आहे. लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या संघर्षाला सुरवात झाली. महायुती असून विरोधात काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचे पाकिस्तान होत आहे, असा खळबळजनक आरोप करत दानवे यांनी संघर्षाची पहिली ठिणगी टाकली.

यावर मग अब्दुल सत्तार यांनी गणेशोत्सवातील वादातून मतदारसंघातील अजिंठा, शिवना भागातील भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप झाला. यामध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उडी घेत पुन्हा जाहीर भाषणातून सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केला. तसेच सत्तार यांच्या सूडाच्या राजकारणाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते.

पण त्याआधीच अब्दुल सत्तार यांनी खेळी केली आणि रावसाहेब दानवे यांच्या सिल्लोडला पाकिस्तान म्हणण्याच्या विधानाचा निषेध म्हणून सिल्लोडमध्ये मोठा मोर्चा काढला. सर्वपक्षीय आणि सर्वसामन्य सिल्लोडकरांचा हा मोर्चा होता असा दावा केला गेला, मात्र त्यात सगळे सत्तार समर्थकच असल्याने यामागे सत्तारांचेच डोके होते हे लपून राहिले नाही.

या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न भाजपकडूनही सुरू होते, अखेर त्यासाठी उद्या (ता. 30) रोजी सिल्लोडमध्ये सत्तारग्रस्त हिंदू व इतर सर्वच जाती-धर्माच्या लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्तार (Abdul Sattar) यांच्या मोर्चा प्रमाणेच उद्याचा मोर्चा देखील सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांचा असणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

सत्तार समर्थकांनी दानवे यांच्याविरोधात मोर्चा काढत मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना भाजप आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील किती लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होतात ? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोर्चा आणि सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे.

मात्र व्यापाऱ्यांनी सणासुदीच्या दिवसात नुकसान टाळण्यासाठी बंदचे आवाहन मागे घ्यावे, असे आवाहन केल्यामुळे बंद मागे घेण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र अब्दुल सत्तार यांच्या सर्वाधिक त्रास आणि जाच हा व्यापाऱ्यांना आहे, त्यामुळे त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निघणारा उद्याचा मोर्चा किती यशस्वी होतो ? यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुक किती चुरशीची होईल, हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT