Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांकडून आधी लाडक्या बहि‍णींना धमकी अन् आता जाहीर माफी, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Assembly Election 2024 : "लाडकी बहीण योजने संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखे काहीच मुद्दे राहिले नाहीत म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत. ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो, पण..."

Jagdish Patil

Kolhapur News, 10 Nov : "माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते.", असं म्हणत भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापूर येथील सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महिलांची जाहीर माफी मागितली आहे.

तसंच आपल्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाडिक म्हणाले, "लाडकी बहीण योजने संदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. काँग्रेस (Congress) आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखे काहीच मुद्दे राहिले नाहीत म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत.

ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो. कदाचित अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळाले नसतील. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं", असे स्पष्टीकरण धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिले.

सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.

मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीकडून गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थे मार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि या पुढे देखील ते सुरू राहील. महिलांचा सन्मान आणि सबलीकरण बद्दलच्या माझ्या या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील अशी मी आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो.

अशा शब्दात धनजंय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महिलांचा आव्हान करण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी माझं वक्तव्य नव्हतं. लाडकी बहीण योजनेचा आधार घेऊन काँग्रेसची मंडळी लव जिहादचा प्रकार करत आहेत. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. निवडणुकीत अपयश येणार हे आता काँग्रेसच्या (Congress) लोकांना कळलेलं आहे.

म्हणून ते अशा संधीची वाट पाहत होते. लोकसभेला फेक नरेटीव्ह सेट करून काँग्रेसने महिला आणि विशिष्ट समुदायाचे मतदान घेतलं. एक वेगळ्या योजनांच्या लाभ घेणारे लोक महायुतीसोबत राहावेत एवढेच आपले अपेक्षा होती, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT