Vaijapur sand mining firing case : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू तस्करीचा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे.
बाभुळगावगंगा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्करांच्या टोळीने बेदम मारहाण करत थेट गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार करणारा मुख्य आरोपी हा श्रीरामपूर नगरपरिषदेचा (Municipal) अपक्ष नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे असल्याचे समोर आले आहे. दाभाडे हा चर्चित नीलेश शेंडगे हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हाही दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फिर्यादी शेतकरी (Farmer) शनिवारी रात्री आपल्या शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोदावरी नदीपात्रातून मोठा आवाज येत असल्याने त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली. तेव्हा नदीपात्रात 10 ते 15 जणांचा जमाव हातात दांडके घेऊन बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले.
फिर्यादी दिसताच विकास उर्फ विकी ढमके याने “तू आमचे लोकेशन महसूल आणि पोलिसांना सांगतोस का?” अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तस्करांच्या टोळीने शेतकऱ्याला पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घाबरलेल्या शेतकऱ्याने तत्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून मदतीसाठी बोलावले. मात्र नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच टोळीने त्यांनाही धमकावत ढकलाढकली सुरू केली.
“नीलेश शेंडगेसारखे संपवतो” म्हणत गोंधळात फरार नगरसेवक अर्जुन दाभाडे याने थेट बंदूक काढून फिर्यादीच्या अंगावर रोखली. “तुला नीलेश शेंडगेसारखे संपवतो,” अशी धमकी देत त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सुदैवाने अंधारामुळे गोळ्यांचा नेम चुकला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नीलेश शेंडगे हत्या प्रकरण आणि ‘मोक्का’सारख्या कठोर कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका बाजूला पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असल्याचा दावा करतात, तर दुसऱ्या बाजूला तोच आरोपी नदीपात्रात अवैध वाळू तस्करी करताना, शस्त्र घेऊन फिरताना आणि थेट गोळीबार करताना दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटला राजकीय किंवा स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत आहे का? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यापूर्वीही त्यांच्या शेताशेजारील नदीपात्रातून वाळू चोरी करत होते. त्यामुळे सर्व आरोपी ओळखीचे असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणी वीरगाव पोलिसांनी अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी बबन ढमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार, राहुल थोरात (सर्व रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू तस्करी, फरार आरोपींची दहशत, मोक्कातील आरोपींकडून थेट गोळीबार आणि शेतकऱ्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका या सर्व घटनांमुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
राजकीय संरक्षण, पोलिस यंत्रणेवरील दबाव आणि संघटित गुन्हेगारी यांच्या संगनमतामुळे ग्रामीण भागात सामान्य नागरिक भयभीत झाले असून, आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन नेमकी किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.