MLA Dharmaraobaba Atram has many other options available : सध्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली, तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणसंग्राम सुरू झाला आहे. ही जागा आपणच लढणार यावर काँग्रेस ठाम असल्याने ही लोकसभा लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच तयारीत असलेले माजी राज्यमंत्री, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (A war has started between Congress and NCP)
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात धर्मरावबाबा आत्राम एक कसलेले, मुरब्बी राजकारणी मानले जातात. त्यांनी आमदारकीसोबतच राज्याचे राज्यमंत्री पदही भूषविले आहे. त्यांनी आपली अहेरी विधानसभा त्यांची कन्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्या कन्येला लढवणार असल्याची माहिती आहे.
फार पूर्वीपासूनच गडचिरोली-चिमूर लोकसभा लढविण्याच्या तयारीत लागले आहेत. त्यांच्या मोकळ्या-ढाकळ्या थेट स्वभावामुळे त्यांनी आपला मनसुबा कधीही लपवून ठेवला नाही. लोकसभा लढविणार हे सातत्याने सांगत आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आपला इरादा कळवला होता. शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना लोकसभेच्या तयारीचे निर्देश दिले होते.
या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसने त्यावर कुठलेही भाष्य करण्याचे टाळले होते. कदाचित तेव्हा महाविकास आघाडीत फूट नको, म्हणून ही दक्षता पाळली गेली असावी. पण आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच काँग्रेस या लोकसभेवर दावा सांगू लागली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली आहे. त्यातही मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून पराभूत झाली आहे.
भाजपला तोडीस तोड टक्कर देऊ शकेल, असा तोलामोलाचा उमेदवार सध्या काँग्रेसकडे दिसून येत नाही. अशा स्थितीत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली तर भाजपला आयते ताट वाढून देण्यासारखे होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अशा वेळेस ही लोकसभा धर्मरावबाबांनी लढवली तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या पदरात पडण्याची शक्यता जास्त आहे. पण काँग्रेस या लोकसभेवरचा आपला हक्क सोडेल, असे वाटत नाही.
अशा स्थितीत धर्मरावबाबा आत्राम भाजपकडे तिकीट मागू शकतात. भाजपचे वाद चव्हाट्यावर येत नसले, तरी तिथेही सर्वकाही आलबेल नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभेत भाजप भाकरी फिरवेल, अशी चर्चा आहे. धर्मरावबाबा आत्राम यापूर्वीही भाजपमध्ये जाऊन आले आहेत. भाजपने त्यांना स्वीकारले नाही, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा बीआरएस पक्षही रेड कार्पेट अंथरून तयार आहेच.
हे सगळे पर्याय नाहीच जमले, तर ते स्वबळावर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यासाठी मागे हटणार नाहीत. 'याल तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय पण लोकसभा लढवणारच', असा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळेच मागील अनेक महिन्यांपासून ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
मेळावे, सभा, लोकांशी थेट संवाद हे सगळं सुरूच आहे. त्यांचे गडचिरोलीचे येणे-जाणे वाढले आहे. त्यांच्या परीने त्यांनी आपली मोर्चेबांधणी केली आहे. फक्त उमेदवारीची वाट आहे. ते आपल्यापुढे सगळेच पर्याय ठेवून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने उमेदवारी नाही दिली तर त्यांना फारसा फरक पडणार नाही.
लढाई सोपी नाहीच..
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभेवर नऊ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या लोकसभेवरून जुंपली असताना भाजप कधीचीच कामाला लागली आहे. त्यांची विविध समाजघटकांसाठी संमेलने सुरू आहेत.
त्यांचे बुथप्रमुख, पेजप्रमुख कामाला लागले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) करीष्मा अद्याप कायम आहे. त्यामुळे भाजपचा (BJP) उमेदवार तुल्यबळ लढत देणार, यात शंका नाही. कॉंग्रेसचा (Congress) कुणी उमेदवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा, कुणीही असो भाजपविरोधात लढणे तेवढे सोपे नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.