Ruta Awhad Sarkarnama
मुंबई

Ruta Awhad : मुंब्रामधील दहावीच्या परीक्षार्थींसाठी ऋता आव्हाडांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, म्हणाल्या...

10th exam students : जाणून घ्या, विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या मुद्य्यावर ही भेट घेतली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Thane News : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावेत, असे संकेत आहेत. मात्र, मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून दूरवर आहेत. अशावेळी शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणे अशक्य ठरणार असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी(NCP) महिला काँग्रेसच्या ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेत त्यांना त्याबाबत माहिती दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. 

मुंब्रा भागातील दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनपासून  4 ते 5 किमी अंतरावर असलेल्या कौसा, देवरी पाडा आदी भागात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. राहत्या घरापासून सुमारे पाच किमी अंतरावर ही केंद्रे असल्याने विद्यार्थ्यांचा अधिकचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. या संदर्भात पटेल शाळेचे शिक्षक अब्दुल रेहमान आणि ईसराईल खान यांनी प्रशासनाशी अनेकवेळा संपर्क साधून केंद्र बदलण्याची विनंती केली होती.

मात्र, त्यावर काहीही तोडगा निघत नव्हता. अखेर ही बाब ऋता आव्हाड यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. 

  ऋता आव्हाड यांनी सांगितले की,  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या मुलांसाठी  परीक्षा केंद्र घरापासून जवळ असले पाहिजे.  मात्र, सध्या देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. शहरात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या कोंडीत अडकल्यास साधारणपणे तीन किमीचे अंतर कापायला किमान एक तास लागत असतो.

शिवाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. या प्रवासात थकलेला विद्यार्थी परीक्षेस कसा सामोरे जाईल, असा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने तत्काळ परीक्षा केंद्रांमध्ये बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT