pcmc.jpg
pcmc.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रशासनाचा काखेत कळसा, गावाला वळसा

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी एमआयडीसीत ऑक्सिजन निर्मितीचे चार कारखाने तथा पुरवठादार असताना त्याचा शहराला पुरवठा २६ किलोमीटर दूर असलेल्या चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथून का केला जात आहे, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला आज केली. त्यामुळे मोठी टंचाई असलेला ऑक्सिजन वेळेत तसेच पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने शेकडो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याकडे त्यांनी पुणे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन वेळेत मिळण्यासाठी चाकणऐवजी भोसरीतून त्याचा पुरवठा करण्याची मागणी जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्राव्दारे आज केली. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयांना चाकण येथून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. हे अंतर जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठा होण्यास अनेकदा विलंब होऊन कोरोना रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे शहरातच असलेल्या भोसरीतूनच त्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जगतापांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही दिवसांपूर्वी शहरातील सर्वच रुग्णालयांत राहिला होता. तो पालिका प्रशासनाने तत्पर हालचाली केल्यामुळे उपलब्ध झाला. परिणामी संभाव्य मोठी दुर्घटना टळली होती. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष जगतापांनी वेधले. 

सध्याही कमतरताच असल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच रुग्णालयांच्या व्यवस्थापनांची मोठी दमछाक होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शहराला एका दिवसाला २५०० ते ३००० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, २० ड्युरा सिलिंडर ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तो सध्या चाकणहून येत आहे. २६ किलोमीटर दूरवर असलेल्या चाकणहून तो येण्यास विलंब होत असल्याने रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादावादी होत आहे.

मागणीनुसार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने खाजगी रुग्णालये व महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे वेळेत व पुरेसा पुरवठा होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरीतील सहानी, सत्रामदास, सांघी, आयनॉक्स, रोहित ऑक्स यांच्याकडून ऑक्सिजन घेतला, तर वेळ वाचणार आहे. तसेच चाकण येथील ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पावरील पिंपरी-चिंचवडचा ताण कमी होऊन जिल्ह्यातील इतर तालुक्यांना त्याचा फायदा होऊन वादविवादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत. यामुळे आपल्या सुचनेचा गांभीर्याने विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जगतापांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT