vishal_kotkar_sandip_gunjal 
विश्लेषण

केडगाव दुहेरी हत्याकांड तपासाचा  केंद्रबिंदू ठरतोय नगरसेवक कोतकर 

नगर : केडगाव येथील दुहेरी हत्याकांड नवनिर्वाचितकॉंग्रेस नगरसेवक विशाल कोतकर याच्या सांगण्यानुसार झाले असल्याचा संशय पोलिसांना असून, आरोपीच्या तपासात तसे निष्पन्न होत आहे. या प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

सरकारनामा ब्युरो

नगर :  केडगाव येथील दुहेरी हत्याकांड नवनिर्वाचित कॉंग्रेस  नगरसेवक विशाल कोतकर याच्या सांगण्यानुसार झाले असल्याचा संशय पोलिसांना असून, आरोपीच्या तपासात तसे निष्पन्न होत आहे. या प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. 

आता नगरसेवक कोतकर याच्याभोवती तपासाचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. दरम्यान, काल अटक केलेल्या संदीप गिऱ्हे व महावीर मोकळे या दोघांना आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सहा दिवसांची (ता. 19 पर्यंत) पोलिस कोठडी दिली आहे. 

केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्या करणारा संदीप गुंजाळ पारनेरच्या पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. प्रारंभी त्याने आपण एकट्यानेच खून केले असल्याचा बनाव केला होता, नंतर मात्र पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने इतर तिघांची नावे सांगितली. 

त्यापैकी संदीप गिऱ्हे व महावीर मोकळ यांना काल पोलिसांनी शिरुर येथून अटक केली. आता विशाल कोतकर व रवी खोलम यांच्या शोधात पोलिस आहेत. या प्रकरणाचा तपास आता आरोपी व कोतकर यांच्यातील संवादाभोवती फिरत आहे. त्यात संदीप गुंजाळ याने विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गुन्ह्याला राजकीय स्वरुप आले आहे. दरम्यान, गिऱ्हे व मोकळे यांनी आम्ही त्यात नाहीच, असा पवित्रा घेतला. आम्ही फक्त घटनास्थळी होतो, असे त्यांनी सांगितले आहे. 


आज गिऱ्हे व मोकळ या दोघांना न्यायालयात उभे केले असता तपास अधिकारी दिलीप पवार यांनी दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीची मागणी केली. संदीप गिऱ्हे याने वसंत ठुबेंवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. ते पिस्तूल त्याने कोठून आणले होते, याचा तपास करावयाचा आहे. आरोपींनी गुन्हा करताना तलवार, गुप्तीचा वापर केला होता, ती हत्यारे हस्तगत करावयाची आहेत. आरोपींनी विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे आरोपी संदीप गुंजाळ याने सांगितले आहे.

 त्यामुळे विशाल कोतकर व रवी खोलम यांना अटक करावयाची आहे. आरोपींनी गुन्ह्याचा कट नेमका कोठे रचला याचा शोध घ्यावयाचा आहे. गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घ्यावयाचा आहे. घटना घडल्यापासून आरोपी कोणाच्या आश्रयाने कोठे राहत होते. आरोपींना कोणी सहकार्य केले याचा शोध घ्यावयाचा असल्याने वरील आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी   तपास अधिकारी दिलीप पवार यांनी केली. 

आरोपीचे वकील म्हणाले, संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे यांचा संदीप गुंजाळ मित्र असून, त्याने नावे घेतल्याने गुन्ह्यात नाव आले आहे. प्रत्यक्षात गुन्ह्यात यांचा सहभाग नाही.त्यानंतर  न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी दिली. 

खून करून पळाले गोव्याकडे 
खून करून गिऱ्हे व मोकळे हे दोघेही कोल्हापूर व गोवा येथे पळून गेले होते. कोल्हापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर ते गोव्याच्या दिशेने निघाले होते. तेथे एक दिवस मुक्काम केला. संदीप गुंजाळने आपली नावे सांगितले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजल्याने त्यांनी पुन्हा चकवा देत पुणे गाठले. 

दरम्यानच्या काळात पोलिस तांत्रिक माहिती घेत होते. त्याआधारे आरोपीच्या मागावर होते. एक पथक कोल्हापूरला रवाना झाले होते. आरोपी पुण्याला आले, असे कळल्याने दुसरे पथक तातडीने पुण्याला गेले. आरोपी शिरुरला एका नातेवाईकाकडे आल्याचे कळताच तेथे संपर्क करून गिऱ्हे याला शिरूरमध्ये पकडले. त्यानंतर पुण्यात जावून पप्पू मोकळेला अटक केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT