Amit Ujagare
दोन समाजातील जातीय हिंसाचारत मणिपूर दोन वर्षे अक्षरशः होरपळून निघाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदा मणिपूरला भेट दिली.
या भेटीत त्यांनी राज्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं तसंच विकासाची विविध पॅकेजेस जाहीर केली.
तसंच हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूरी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, तसंच सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहनही केलं.
मोदींनी यावेळी ७,००० कोटींच्या विकासकामांची पायाभरणी केली. तसंच सरकारकडून सीमावर्ती राज्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
यावेळी पंतप्रधानांनी मणिपूरसाठी ३,००० कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं. ज्यामध्ये हिंसाचारामुळं विस्थापित झालेल्यांना मदतीसाठी ५०० कोटींचा समावेश आहे.
तसंच हिंसाचारात घरं गमावलेल्या कुटुंबांसाठी ७,००० नवीन घरं बांधून देणं तसंच योग्य ठिकाणी पुनर्वसनाला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही मोदींनी मणिपुरी जनतेला दिलं.
मणिपूर ही आशा आणि आकांक्षेची भूमी आहे. पीडितांच्या कॅम्पला भेट दिल्यानंतर मी हे अत्यंत विश्वासानं सागू शकतो की मणिपूरमध्ये आशेची नवी पहाट आणि विश्वास वाढीस लागला आहे, असंही ते म्हणाले.
मणिपूरच्या नावातच मनी हा शब्द आहे. याचा अर्थ असा की हे राज्य भविष्यात संपूर्ण ईशान्य भारताला उजळून काढणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी चूरचंदपूर इथं बोलताना सांगितलं.