Amit Ujagare
तुम्ही जर ८व्या वेतन आयोगाची प्रत्येक अपडेट जाणून घेत असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे.
संसदेत नुकतेच लिखित उत्तरात अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ८व्या वेतन आयोगाची टाईमलाईन सांगितली अर्थात हा आयोग कधी कसा लागू होईल. किती पगार वाढेल, फरक किती मिळेल?
चौधरी यांच्या माहितीनुसार, सरकारनं अधिकृतरित्या ८व्या वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी केली आहे. या आयोगाला १८ महिन्यात आपल्या शिफारसींचा अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
या अहवालात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, अलाऊन्सेस आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल? याबाबतच्या शिफारसी सरकारकडं करायच्या आहेत. आयोगासंदर्भातील नोटिफिकेशन सरकारनं ३ नोव्हेंबर २०२५ रोजीच काढलं आहे.
या नोटिफिकेशनमध्ये आयोगाची स्थापना, त्याचा अध्यक्ष आणि सदस्य यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर ८व्या वेतन आयोगाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी ही तेव्हाच होईल जेव्हा आयोगाकडून शिफारशी सादर होतील आणि त्या सरकारकडून स्विकारल्या जातील.
त्याचबरोबर आयोगानं एकांतवासात राहून शिफारशींवर काम करता येणार नाही तर अॅक्टिव्ह राहुन त्यासाठी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सूचना जाणून घ्यायच्या आहेत.
या ८ व्या वेतन आयोगाचे फायदे १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहेत. त्यामुळं प्रत्यक्षात आयोगाचे फायदे मिळायला बराच काळ जाऊ शकतो.
त्याचबरोबर ज्या पगारामध्ये ८व्या वेतन आयोगाप्रमाणं पगार सुरु होईल, त्यानंतरच्या काही दिवसांतच १ जानेवारी २०२६ पासूनचा फरकही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान, सरकारनं अद्याप पगारवाढ नेमकी किती असेल? याबाबत कुठलाही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. पण आधीच्या पगारवाढीचे निकष यावेळीही लागू होतील.
तरीही ८व्या वेतन आयोगात २०-३५ टक्के पगारवाढ होऊ शकते. यामध्ये २.४ ते ३.० इतका फिटमेंट फॅक्टर राहील. पण ही आकडेवारी अंदाजे वर्तवण्यात आली आहे, याचं कुठलंही आश्वासन सरकारनं दिलेलं नाही.