Amit Ujagare
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात आज बारामतीजवळ निधन झालं, ६७ वर्षांचे होते. यानिमित्त अजितदादा हे व्यक्तीमत्व कसं होतं, जाणून घेऊयात.
दादा नेहमीच म्हणायचे, "आम्ही कामाची माणसं आहोत", पण त्यांच्या बोलण्यातून हास्य फुलवण्याची कला अवगत होती.
अजित पवार कठोर दिसायचे, पण त्यांच्या अंत:करणात जिव्हाळा होता. त्यांच्या या छटांमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात ते 'दादा' बनले. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे, पण कामात काटेकोर, असं त्यांचं व्यक्तीमत्व होतं.
एकदा रॅलीत दूरून एक कार्यकर्ता ओरडला, "दादा, लव यू!" दादांनी त्याला ताबडतोब उत्तर दिलं, "आधी घडाळ्याचं बटन दाबा (राष्ट्रवादीला मत द्या) मग घरी जाऊन बायकोला लव यू, लव यू म्हणत राहा!". त्यांच्या या विधानावर सर्वजण खळखळून हासले. पण यातून त्यांचा प्रचाराचा मुद्दाही स्पष्ट झाला.
सुप्रिया सुळे प्रचार सभांना का येत नाहीत? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर दादांनी मिश्किलपणे सांगितलं. "तिने मला सांगितलं की दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं!". हे ऐकून पत्रकार आणि उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला.
एका सभेत बाबा राक्षे किंवा दादांचे सल्लागार काही मुद्दे सांगत होते. त्यावर दादा म्हणाले, "माझं टक्कल पडलं तरी लोक मला शिकवतायत... आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, ते तुम्ही ठरवा!", त्यांच्या या विधानावर सभेत एकच हशा पिकला.
नेत्यांनी एकदा अजितदादांना आमच्या पाठीशी ताकद मागितली तर त्यावर दादांनी मिश्किल सल्ला देताना म्हटलं की, "खारीक, खोबरं, जर्दाळू, बदाम, पिस्ते वगैरे खा!" म्हणजेच आधी स्वतः मजबूत व्हा.
पुणे सायकल स्पर्धेच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना मिश्किलपणे अजितदादा म्हणाले होते की, "पुणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. पण महापालिका निवडणुकीत थोडा अधिक प्रतिसाद दिला असता तर बरं झालं असतं!" यावेळीही चांगलाच हशा पिकला होता.