Jagdish Patil
सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
कारण या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या बिनविरोध परंपरेला राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी आव्हान दिलं होतं.
मात्र, छाननीत थिटेंचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर मोठा जल्लोष केला.
हा जल्लोष सुरू असताना राजन पाटलांचे थोरले चिरंजीव बाळराजेंनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं.
कॅमेऱ्याकडे बोट दाखवत 'अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असं ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर बाळराजेंबाबतची माहिती जाणून घेऊया.
माजी आमदार राजन पाटील यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी बाळराजे थोरले तर अजिंक्यराणा हे धाकले आहेत.
बाळराजे पाटील हे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सदस्य राहिले आहेत.
2007 साली मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख पंडित देशमुख याच्या हत्या प्रकरणात बाळराजे हे प्रमुख आरोपी होते. नंतर त्यांची या आरोपातून निर्दोष सुटका झाली.
2014 साली सोलापूर युवासेना उपप्रमुख महेश देशमुख हल्ला प्रकरणात बाळराजे, अजिंक्यराणा यांच्यावर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, एका भाषणात खुद्द राजन पाटील यांनी वयाच्या सतराव्या वर्षी 302 ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत असं वक्तव्य केलं होतं.