Amit Ujagare
भारतीय सैन्य दल आणि भारतीय रेल्वेनं संस्थागत सहकार्य मजबूत करण्यासाठी एक नवीन 'फ्रेमवर्क ऑफ कोऑपरेशन' अर्थात परस्पर सहकार्याची चौकट तयार केली आहे.
याचा उद्देश अग्निवीर अन् सेवानिवृत्त जवानांना सैन्यसेवांनंतर चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं हे आहे.
रेल्वेच्या नव्या आरक्षण अन् रोजगाराच्या धोरणांनुसार, माजी सैनिकांसाठी लेवल -२ अन् त्यावरील पदांसाठी १० टक्के आरक्षण तर लेवल-१ पदांसाठी २० टक्के आरक्षण लागू आहे.
यामध्ये माजी अग्निवीरांसाठी लेवल-२ तसंच वरच्या पदांसाठी ५ टक्के आणि लेवल-१मध्ये १० टक्के आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे.
सन २०२४ आणि २०२५ मध्ये रेल्वे भारतीमध्ये एकूण १४,७८८ पदं हे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यांपैकी ६,४८५ पदं ही लेवल -१ आणि ८,३०३ पदं ही लेवल -२ वरील माजी सैनिकांसाठी आहेत.
यामध्ये लेवल -१ची (माजी ग्रुप डी) भरती ही रेल्वे भरती केंद्राकडून (RRC) तर लेवल - २ आणि त्यावरील भरती ही रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) माध्यमातून स्पर्धा परिक्षांद्वारे केली जाते.
रिक्त जागा तातडीनं भरण्यासाठी रेल्वेनं निर्णय घेतला की, नियमित भरती पूर्ण होईपर्यंत माजी सैनिकांना 'पॉईंट्समन' या पदावर कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यात येईल.
केंद्रातील दोन विभागांमधील ही सहकार्य चौकट माजी सैनिकांचा अनुभव, शिस्त आणि तांत्रिक दक्षता याचा चांगला उपयोग करुन पायाभूत संरचना सशक्त करण्याच्या दिशेनं मोठ पाऊल आहे.