सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या हटके ग्रामीण भाषणशैली आणि रोखठोक विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
रावसाहेब दानवे आणि ठाकरे गटाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात.
याचवेळी राजकीय नेत्यांचा नेहमीच पेहराव आणि कार्यकर्ते किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या कार्यक्रमात त्यांच्या आग्रहावरून केलेला पेहराव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.
एरवी विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे दोन नेते एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच...
तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नुकतेच बंजारा समाचजाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बंजारा होळी गीत आणि नृत्य स्पर्धेचा हा कार्यक्रम असल्याने तिथे मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक पेहरावात स्पर्धक व नागरिक सहभागी झाले होते.
विजेत्यांना पारितोषक वितरण करण्यापूर्वी आयोजक आणि उपस्थितांनी दोन्ही दानवेंना बंजारा पेहराव करण्याची विनंती करण्यात आली होती.
दोघांनीही ती मान्य केली आणि मग त्यांना खास बंजारा पद्धतीचा गळ्यात पट्टा, डोक्यावर टोपी घालण्यात आली.यानंतर दोन्ही दानवेंनी बंजारा पेहरावात त्यांच्याच गाण्यावर ठेका धरला.
'जैसी बोली, वैसा भेस` असं आपल्या भाषणातून नेहमी सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी ते प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिले.बंजारा समाजात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.