Amit Ujagare
हिंदी-मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसाला आणि ठाकरे बंधुंना आव्हान देणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना आज संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दुबेंसह महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे, तर ११ भाजपच्या खासदारांना संसदरत्नमध्ये समावेश आहे.
या संसदरत्नांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी या खासदारांचा समावेश आहे.
तर भाजपच्या खासदारांमध्ये भर्तृहरी महताब, प्रवीण पटेल, रवी किशन, निशिकांत दुबे, बिद्युत बरन मेहतो, पी. पी. चौधरी, मदन राठोड, सी. एन. आण्णादुराई, दिलीप सैकीया यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कम्युनिस्ट विचारांच्या रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) या पक्षाचे केरळमधील खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
संसदरत्न पटकावणारे निशिकांत दुबे हे भाजपचे वादग्रस्त विधानं करणारे खासदार म्हणून परिचित आहेत. अनेकदा ते प्रक्षोभक विधान केल्यानं टीकेचे धनी झाले आहेत.
नुकतेच त्यांनी महाराष्ट्रातील हिंदी-मराठी वादावर भूमिका मांडताना अत्यंत प्रक्षोभक विधान केलं होतं. मराठी माणसानं आमच्याकडं येऊ दाखवावं त्यांना 'पटक पटक के मारेंगे' असं त्यांनी म्हटलं होतं.
पण याच दुबेंना राज ठाकरेंना मुंबईत येऊन दाखवा समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं.
तर वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या काँग्रेसच्या खासदारांनी त्यांना संसद भवनात जाऊन याबाबत जाब विचारला होता.