Rashmi Mane
मूळचे कोकणातील मालवणचे असणारे सुरेश प्रभू यांचा आज ( 11 जुलै ) वाढदिवस.
सुरेश प्रभाकर प्रभू हे भारतीय जनता पक्षामधील एक जेष्ठ राजकारणी व भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात 2014 ते 2019 या काळात त्यांनी रेल्वे मंत्री होते. तब्बल 26 वर्ष राजकारणात असणाऱ्या सुरेश प्रभू यांनी 2 फेब्रुवारी 2022 ला राजकारणातून निवृत्ती घेतली.
सुरेश प्रभू यांनी त्यांच्या 26 वर्षांच्या कार्यकाळात चारवेळा लोकसभेत आणि दोनवेळा राज्यसभेत, तसंच रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, अर्थ मंत्रालय अशा पहिल्या पाच-सहा महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खात्यांमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली.
सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 रोजी मुंबईत झाला. दादरच्या शारदाश्रम हायस्कूलमधून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. यानंतर ते 'सीए' झाले.
प्रभू यांनी पुढेही अभ्यास सुरू ठेवला. त्यांनंतर त्यांनी मुंबईच्या न्यू लॉ कॉलेजमधून एल.एल. बी ही पदवी मिळवली. सुरेश प्रभू मुंबईत चार्टर्ड अकाउंटन्सी फर्मही चालवत होते. यानंतर ते सारस्वत बँकेचे अध्यक्षही झाले.
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले प्रभू हे 'भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे' सदस्य देखील आहेत.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रभू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंनी सुरेश प्रभू यांना कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवून दिले आणि 1996 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर ते सलग चार वेळा खासदार होते.
प्रभू यांच्या कार्यकाळात 1999 ते 2002 या काळात केंद्र सरकारच्या अनेक खात्यांच्या प्रमुख खात्यांचे मंत्री होते. 2014 मध्ये काही कारणांमुळे सुरेश प्रभू यांनी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाले.