Ganesh Sonawane
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल पहिल्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. धुळे जिल्ह्यात जलसंधारण, वनीकरण, तसंच वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे देखील उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा आदिवासींचा पाडा आहे. या पाड्याची 1992 पूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती. इथे सर्व काही उजाड होतं. समोर ओसाड माळरान होतं. पिण्यासाठी घोटभर पाणी मिळत नव्हतं. पाण्यासाठी तर वणवण करावी लागत होती.
मात्र 1992 नंतर या पाड्याचे चित्र पालटलं. चैत्राम पवार या पाड्याच्या मदतीला धावले. गावातले लोक रोजगारासाठी गाव सोडत होते. गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत होती. अशा वेळी पवार यांनी हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला.
वन रक्षणासाठी त्यांनी समिती तयार केली. झाडांची लागवड केली गेली. शिवाय त्यांची निगाही राखली गेली. एकीकडे ओसाड असलेल्या या जमिनीवर बघता बघता जंगल तयार केलं. याचे सर्व श्रेय पवार यांचे होते.
पवार यांच्या लोक चळवळीची दखल महाराष्ट्रानेच नाही तर जगाने देखील घेतली. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने दुसरा क्रमांक मिळवला होता.
चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे त्यांनी संरक्षण केले होते. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले.
चैत्राम पवार यांनी जवळपास 5,000 हून अधिक झाडे लावली होती. जैवविविधतेचे संवर्धनाच्या माध्यमातून 8 दुर्मीळ प्राणीप्रजाती, 48 पक्षीप्रजाती व 435 झाडे, वेली व झुडुपांच्या प्रजातींना आश्रय दिला.