सरकारनामा ब्यूरो
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना एका प्रकरणात सुरत न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. 27 मार्च रोजी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना नोटीस पाठवून 22 एप्रिलपर्यंत त्यांचं अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितलं आहे.
राहुल गांधी हे दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील 12, तुघलक रोडवरील सरकारी बंगल्यात राहतात. 2005 पासून त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे.
या नोटिशीनंतर देशभरात काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. काँग्रेस नेते आणि काँग्रेसच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मेरा घर, आपका घर कँम्पेन सुरू केलं आहे.
काँग्रेसची ही मोहीम सुरू असतानाच एका महिलेने चक्क राहुल गांधी यांच्या नावावर आपलं घर केलं आहे. राजकुमारी गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. त्या दिल्लीतील मंगोलपुरी येथे राहतात.
गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवादलाशी संबंधित आहेत.
गुप्ता यांचं मंगोलपुरीत चार मजली अलिशान घर आहे. या महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर घर खरेदी केल्याचे कागदपत्रंही शेअर केले आहेत.
या महिलेने केवळ सोशल मीडियावर घराचा फोटो न टाकता खरोखरच आपलं घर राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे.
लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेल्या सदस्याला त्यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून एक महिन्याच्या आत अधिकृत बंगला रिकामा करावा लागतो.