Amit Ujagare
कर्नाटकच्या भूमीत जन्मलेल्या कीर्ती किरण पुजार यांनी महाराष्ट्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
धाराशीवला येण्यापूर्वी चंद्रपूर इथं उपविभागीय अधिकारी, किनवट इथं आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा जबाबदारी त्यांनी पार पाडल्या आहेत.
धाराशीवमध्ये जिल्हाधिकारी म्हणून पुजार यांची पहिलीच नियुक्ती असून त्यांच्यासाठी चांगल्या कामाची संधी होती.
पण धाराशीवमध्ये महापुराची स्थिती निर्माण झालेली असताना कीर्ती किरण पुजार हे वादात सापडले आहेत.
तुळजापुरातील नवरात्र महोत्सवात ते सहकुटुंब सहभागी झाले. यावेळी स्टेजवर गायक आणि नर्तक कलाकारांसोबत उपस्थित राहत गाण्याच्या ठेक्यावर थिरकल्यानं ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
एकीकडं धाराशीवमध्ये न भूतो न भविष्य अशा महापुरानं वेढा दिलेला आहे, नागरिकांच्या शेतीसोबतच घरसंसारही पाण्यात वाहून गेला असतानाच त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
पण जिल्हाधिकाऱ्यांवर टीका होत असली तरी काही जणांनी त्यांची पाठराखणही केली आहे. गायक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काही क्षण व्यासपीठावर येऊन ताल धरला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
एकीकडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळं हाहाकार माजला आहे. यामध्ये १५० जनावरांचा मृत्यू, ८ नागरिकांचा मृत्यू तर लाखो हेक्टरवरील पीकं वाहून गेली आहेत.