Amit Ujagare
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे हायप्रोफाईल मोस्ट बॅचलर राजकारणी आहेत. ते सध्या ५५ वर्षांचे आहेत पण अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही.
त्यामुळं त्यांच्या लग्नाचा विषय अधुनमधून त्यांच्या जवळच्या राजकीय लोकांकडून चर्चेला येत असतो, त्यानंतर माध्यमांमध्येही त्याची चर्चा होते.
पण आता जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला नामक मिठाईच्या दुकानाच्या मालकानं राहुल गांधींना लग्नाबाबत महत्वाचा सल्ला दिला.
काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल गांधींनी दिवाळीनिमित्त या दुकानाला भेट दिली तसंच तिथं इमरती आणि लाडू आपल्या हातानं तयार केले.
अनेक वर्षांपासून या प्रसिद्ध दुकानाचा गोडवा अद्यापही कायम आहे, त्यांचा पाहुणार आणि आपलेपणा हा हृदयात कोरुन ठेवावा असा आहे. असं गांधींनी म्हटलंय.
दीपावलीचा खरा गोडवा केवळ ताटातच नाही तर नाती आणि समाजात देखील असतो. तुम्ही सांगा तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात, ती कशी खास बनवत आहात? असं काँग्रेसनं हे ट्विट करताना म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींचं स्वागत दुकानमालकानं मोठ्या उत्साहात केलं. तसंच त्यांना मिठाई कशी बनवायची याची बेसिक माहिती दिली. तसंच त्यांच्याशी संवाद साधताना लग्नाचा विषयही छेडला.
दुकानदारानं राहुल गांधींना म्हटलं की, तुमच्या आजीला, आजोबांना, बहिणीला सर्वांना आम्ही मिठाई सर्व्ह केली आहे. आता आम्ही एकाच गोष्टीची वाट पाहतोय ती म्हणजे तुम्ही लवकर लग्न करा त्यासाठी सर्व मिठाई आमच्या दुकानातूनच घ्या.