Ganesh Sonawane
महायुती सरकारच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या 'लाडकी बहीण योजना'वर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
गौतमी पाटील यांच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम आण्णा नाईक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
‘लाडकी बहीण’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. सातारा येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी 'लाडकी बहीण' सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला.
या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’यावर आधारलेली ही कथा असणार आहे.
शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते असून, दिग्दर्शन गणेश शिंदे यांचे राहील. चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाचे काम शितल शिंदे यांनी साकारले आहे.
या चित्रपटामध्ये मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून, संगीत विनीत देशपांडे यांचे लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात 'लाडकी बहीण'मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.