Rashmi Mane
जपानसाठी 21 ऑक्टोबरचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशाच्या संसदेने साने ताकाइची यांची पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली असून, जपानच्या राजकीय इतिहासात हा एक अभूतपूर्व क्षण ठरला आहे.
या निर्णयामुळे जपानमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून जपानमध्ये राजकीय अस्थिरता आणि सत्तासंघर्ष सुरू होता.
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तेचा मार्ग ताकाइचींसाठी मोकळा झाला. इशिबा फक्त एका वर्षासाठीच सत्तेत राहिले होते.
64 वर्षीय साने ताकाइची या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या (LDP) नेत्या आहेत. त्यांनी जपान इनोव्हेशन पार्टीसोबत नव्या आघाडीची स्थापना केली आहे.
या आघाडीमुळे त्यांना पंतप्रधानपद मिळाले असले तरी, संसदेत त्यांना अद्याप स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आगामी काळात ताकाइचींना विविध विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल, अन्यथा त्यांचा कार्यकाळ मर्यादित ठरू शकतो.
साने ताकाइची या फक्त राजकारणीच नाहीत, तर त्या एक हेवी मेटल ड्रमर आणि बाईकर म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी 1993 मध्ये आपल्या जन्मगाव नारा येथून पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती.
त्यानंतर त्यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत व्यवहार आणि लैंगिक समानता यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व केले आहे.
जपानच्या राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व अद्याप मर्यादित असताना, ताकाइचींची पंतप्रधानपदावर नियुक्ती ही परिवर्तनाची नांदी मानली जात आहे.