अनुराधा धावडे
महाराष्ट्रात 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला' हा वाक्यप्रचार प्रचलित आहे. यामागे कारणही तसेच आहे.
१९६२ मध्ये भारत-चीन युद्धामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान, तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. मेनन यांनी राजीनामा दिला.
१ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच संरक्षण खात्याचा कारभार सांभाळला.
पंडित नेहरुंनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना हे पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलवून घेतलं.
लेखक अनिल पाटील लिखित लोकनेते -यशवंतराव चव्हाण या पुस्तकात या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
'यशवंतराव मुंबईतील सचिवालयात दैनंदिन कामकाज करत असताना त्यांना दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन आला.
चिटणीसांनी फोन यशवंतराव यांच्याकडे दिला. फोनवरुनच जवाहरलाल नेहरुंनी "सरंक्षण खात्याची जबाबदारी, मी तुमच्यावर सोपवू इच्छितो. त्यासाठी तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे आणि त्याची फारशी चर्चा न करता हो किंवा नाही एवढंच उत्तर मला हवं असल्याचं सांगितलं.
थोडा वेळ विचार करून यशवंतराव चव्हाण यांनी ,"मला एका व्यक्तीला विचारावं लागेल, असं उत्तर दिलं
त्यांच्या उत्तरावर रागातच नेहरूंनी विचारलं, "अशी कोणती व्यक्ती आहे, की जिला विचारल्याशिवाय काम अडणार आहे?"
यावर यशवंतराव बोलले, "मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडून अगोदर घ्यावयास हवी."
यशवंतरावांच्या या उत्तरावर हसतच पंडित नेहरुंनी "हो जरुर ! सौ. चव्हाणांशी तुम्ही जरुर बोला आणि दोन दिवसांत तुमचा निर्णय मला कळवा." असं सांगितलं
आणि दोन दिवसांनी यशवंतरावांनी आपण दिल्लीला येण्यास तयार असल्याचे नेहरुंना कळविले.'
तेव्हापासून 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला' हा वाक्यप्रचार प्रचलित झाली.