Amit Ujagare
पश्चिम बंगालचं राजकारण हे कायम रक्तरंजित राहिलं आहे. त्यातच आता नव्यानं मुख्यमंत्री बनलेले सुवेंदू अधिकारी यांच्या ४ अत्यंत विश्वासू व्यक्तींच्या हत्या झाल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत.
तीनच दिवसांपूर्वी अर्थात ६ मे २०२६ रोजी सुवेंदू अधिकारी यांच्या चौथ्या पीएची निर्घृण हत्या करण्यात आली, त्यानंतर ही चर्चा सुरु झाली.
पण या हत्यांची मोडस ऑपरेंडी पाहिल्यास त्यामागचं राजकारणंही कळू शकेल. २०१३ ते २०२६ या १३ वर्षांच्या काळात या चौघांचे मृत्यू झाले आहेत.
विशेष म्हणजे या चौघांमधील समान गोष्ट म्हणजे सुवेंदू अधिकारी. तर त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक खासगी सहाय्यक, एक PSO, एक निवडणूक एजंट, एक राजकीय सचिव यांचा समावेश होता.
६ मे २०२६ च्या रात्री चंद्रनाथ राठ यांची स्कॉर्पियो गाडीत पॉईंट ब्लँक गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी ४० मिनिटे आधी रेकी करुन ५५ सेकंदात सुनियोजित हल्ला करण्यात आला होता.
२०१३ मध्ये प्रदीप झा (वय ४२, खासगी सहाय्यक आणि राजकीय सचिव) यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. कोलकात्याच्या स्टँड रोडवर एका फुटपाथवर ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. दारुच्या ओव्हरडोसमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं होतं.
२०१८ मध्ये सुब्रतो चक्रवर्ती (वय ४०) यांनी आपल्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.
२०२१ मध्ये पुलक लाहिडी (पीए, निवडणूक एजंट) यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. कुटुंबाच्या आरोपांनंतर पोलिसांनी हत्येची केस चालवली, पण यात पुढे काहीच झालं नाही आणि केस बंद झाली.
या चारही प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी कट किंवा काही ठोस पुरावे सार्वजनिक स्वरुपात समोर आणलेले नाहीत, तर या प्रकरणांचा तपासही बंद करण्यात आला आहे.