Amit Ujagare
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे राजभवनातून थेट शेतात गेल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यांनी चक्क हातात नांगर धरुन ज्वारीची पेरणी देखील केली.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडाचे आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्या शेताला राज्यपालांनी भेट दिली.
यावेळी राऊत कुटुंबानं देखील नैसर्गिक शेतीत पिकविलेल्या वस्तूंची अनोखी भेट देऊन राज्यपाल देवव्रत यांचा सत्कार केला. राज्यपालांची भेट संस्मरणीय करण्यासाठी 'पावरी' हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आलं.
इतरही शेतकऱ्यांशी शेतीविषयी चर्चा करतांना आपण स्वतः शेतकरी असून आपल्याकडं अनेक देशी गायी असल्यानं संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो आणि ती लाभदायी असल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.
राऊत कुटुंबानं खास ग्रामीण चवीची नागलीची पेज, तांदळाचे धिरडे यावेळी राज्यपालांना खाऊ घातले. घरात जमिनीवर बसून राज्यपालांनी या अस्सल ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतला.
कौटुंबिक स्नेहाचा परिचय देत त्यांनी कुटुंबातील सदस्यांची प्रेमाने विचारपूस केली. यावेळी शेताच्या बांधावर त्यांनी वृक्षारोपणही केले.
राऊत यांच्या जनावरांच्या गोठ्याची पाहणी देखील यावेळी राज्यपालांनी केली. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानं लावलेल्या स्टॉललाही भेट दिली.