Deepak Kulkarni
अखेर गोकुळ दूध संघावर सर्वात तरुण चेहरा अध्यक्ष पदावर विराजमान झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचे निवड झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एन्ट्री केलेल्या नवीद यांना अध्यक्ष केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनेक संचालक ज्येष्ठ तज्ञ आणि अनुभवी असतानाच सर्वसामान्य संचालक अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकला असता. मात्र, अपरिहृयता आणि रणनीतीचा विचार करता नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष करावे लागले
गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा काळ जसा रंजक आहे, तशीच नवीद यांची राजकीय कारकीर्दही तितकीच रंजक आहे.
नवीद मुश्रीफ यांचे प्राथमिक शिक्षण कागल मधीलच हिंदुराव घाटगे विद्यामंदिर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव घाटगे विद्यामंदिर येथे झाले. तर कागलमधीलच डी आर माने येथे महाविद्यालय शिक्षण पार पडले. पुढील शिक्षणासाठी ते दिल्ली येथे राहिले. रॉयल विद्यापीठात सामाजिक विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.
कोल्हापुरात येत त्यांनी वडिलांच्या राजकीय जीवनात सोबत प्रवास सुरू केला. कार्यकर्त्यांच्या भेटी गाठीवर आजही त्यांचा भर कायम आहे. यातूनच 2010 साली त्यांची शिवाजी विकास सोसायटीचे संचालक म्हणून निवड झाली. तिथूनच त्यांची स्थानिक राजकारणाला सुरुवात झाली.
2021 साली त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री केली. कोरोना काळात झालेल्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी कागलमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर श्री संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले.
शिवाय हसन मुश्रीफ फाउंडेशनचे ते संस्थापकीय अध्यक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडील हसन मुश्रीफ यांच्या विजयाची धुरा त्यांनी स्वतः खांद्यावर घेतली होती.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशातच गोकुळ दूध संघावर अध्यक्ष होताच जिल्ह्यातील राजकीय चर्चांना अनेक फाटे फुटले आहेत.