Rajanand More
मुख्यमंत्री म्हटलं की प्रशासन त्यांच्या कार्यक्रमांसाठी जीव तोडून मेहनत घेते. एकही अडथळा येऊ नये, यासाठी अधिकारी सज्ज असतात. पण एका लग्नासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठेपणा दाखविल्याचे समोर आले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा एक निर्णय सध्या चर्चेत आहे. ज्या ठिकाणी लग्न होते, तिथेच मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने ऐनवेळी विवाहस्थळ बदलण्याची टांगती तलवार मुलीच्या कुटुंबावर होती.
जामनगर येथील संजना परमार यांचे आज (ता. २३) सिटी टाऊन हॉलमध्ये लग्न होते. त्यासाठी आधीच बुकिंग होते. तर दुसऱ्यादिवशी याचठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ठरला होता.
CM येणार असल्याने आधीपासून सुरक्षेच्या कारणास्तव त्याठिकाणी अनेक बंधने घातली जाऊ शकतात. या भीतीने कुटुंब अडचणीत आले होते.
कुटुंबाने थेट मुख्यमंत्री पेटल यांच्या कार्याललयाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली.
मुलीच्या लग्नात अडचणी येऊ नयेत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट सरकारी कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठिकाण बदलण्यातही आले.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: संबंधित कुटुंबाशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. लग्न ठरलेल्या ठिकाणीच होईल, आम्ही ठिकाण बदलू, असे त्यांना आश्वस्त केले.
मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे लग्नकार्य वेळेत पार पडल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.