सरकारनामा ब्यूरो
वयाच्या 73 व्या वर्षी राज्याचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या तंदुरुस्त आणि निरोगी आरोग्याचा मंत्र काय आहे जाणून घेऊयात.
"माझी तंदुरुस्ती पाहून अनेक जण विचारतात, ‘तुम्ही इतके फिट कसे?’ याचे उत्तर सोपे आहे. स्वत:ला वेळ द्या, प्रकृतीची काळजी घ्या आणि चांगल्या सवयी लावा", असं गुलाबराव गावंडे सांगतात.
"प्राणायाम करा, योगासने करा, नैसर्गिक आहार घ्या आणि निरोगी राहा. 'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे'! ती जपा आणि आयुष्यात सदैव आनंदी रहा. हेच वयाच्या 73 व्या वर्षी निरोगी आरोग्याचे रहस्य असल्याचे मंत्री गावंडे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या फिटनेसचा राजमार्ग म्हणजे नियमित योग, प्राणायाम, ध्यान, आणि योग्य आहार करणे. त्यांना शरीर तंदुरुस्त ठेवण्याची आवड बालपणापासूनचं होती. या सवयींमुळे ते आजही निरोगी आहेत.
सूर्यनमस्काराने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. यात ते भुजंगासन, ताडासन, आणि वज्रासन ही आसने आणि प्राणायाममध्ये अनुलोम-विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती हे तीन मुख्य प्राणायाम नियमित करतात.
सकाळी उठल्यावर लिंबूपाणी पिणे, काही वेळाने कधी गुळवेलचा काढा तर कधी तुळशीचा काढा, बेलाचा रस ते पितात यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते असं ते सांगतात, तर जेवणात प्रामुख्याने भाजी, चपाती, आणि तूप-भात हा पारंपरिक आहार असतो.
73 व्या वर्षीही ते तलवार, लाठी-काठी चालवू शकतात. एवढा आत्मविश्वास व ऊर्जा त्यांना योग, ध्यान, आणि सकस आहार केल्याने मिळतो अस ते नेहमी सांगतात.
स्वत:साठी वेळ काढा, शरिराची काळजी घ्या, आणि चांगल्या सवयी लावा. असा संदेश मंत्री गुलाबराव गावंडे सर्वांना देतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी वेळ देतो, पण स्वतःसाठी पुरेसा वेळ देत नाही. पैसा, प्रतिष्ठा, यश हे सर्व आरोग्याच्या आधारावरच टिकते. म्हणूनच, तंदुरुस्त शरीर हीच खरी संपत्ती आहे! हा फिटनेसचा मंत्र त्यांनी सांगितला.