Amit Ujagare
झारखंडच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव आणि झारखंड राज्याच्या निर्मितीचे जनक शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत निधन झालं.
आठ वेळा खासदार राहिलेले शिबू सोरेन हे स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासी राजकारणाचे स्तंभपुरुष म्हणून ओळखले जातात.
शिबू सोरेन हे केवळ राजकारणी नव्हते तर ते आंदोलनकारी होते, आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं होतं.
झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला, हाच पक्ष सध्या झारखंडमध्ये सत्तेत असून त्यांचे पुत्र हेमंत सोरेन आता या पक्षाची धुरा सांभाळत आहेत.
त्यांनी २००४ मध्ये युपीए सरकारच्या काळात कोळसा व खनिकर्म मंत्री म्हणून कामकाज पाहिलं.
१९७० मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष स्थापन केला, या पक्षाचा मुख्य उद्देश हा झारखंड वेगळ राज्य निर्माण करणं हा होता.
त्यासाठी त्यांनी जल, जंगल आणि जमीनीसाठी आंदोलन सुरु केलं. १९८० मध्ये पहिल्यांदा खासदार बनल्यानंतर त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी आवाज उठवला.
त्यांची ओळख ही राजकारणी म्हणून नव्हे तर जननायक म्हणून झाली. त्यांनी आदिवासींच्या अस्मितेला नवी ओळख दिली. लहानपणापासून त्यांनी आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार पाहिले आणि अनुभवले होते.
त्यांच्या मेहनतीमुळं १५ नोव्हेंबर २००० मध्ये बिहारपासून झारखंड राज्य वेगळं झालं. त्यानंतर तीन वेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री राहिले. याकाळात त्यांनी आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या.