Amit Ujagare
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसनं प्रवासासाठी अनेक सवलतीच्या योजना दिल्या जात आहेत. ज्याचा फायदा लाखो प्रवाशी घेत आहेत.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, महिलांसाठी अर्ध्या तिकीटात प्रवास, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा पास अशा अनेक योजना आहेत.
पण आता या योजना एका झटक्यात सरकारनं बंद करण्याचा घाट घातला आहे. प्रत्यक्षात योजना बंद होणार नसली तरी त्याचा थेट लाभ घेता येणार नाही.
म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी आधार कार्ड पुरेस होतं पण आता हे कार्ड देखील चालणार नाही. कारण सरकारनं आता नवं कार्ड लागू केलं आहे.
या नव्या कार्डला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC Card) असं म्हटलं आहे. हे कार्ड देशभरातील कुठल्याही सरकारी वाहनांमधून प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलं आहे.
त्यामुळं जर हे कार्ड प्रवाशाकडं असेल तरच त्याला एसटीच्या वर दिलेल्या अर्धे तिकीट, मोफत, सवलतीचा पास या योजनांचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. १ मार्च २०२६ पासून हे कार्ड लागू होणार आहे.
NCMC कार्डची वैशिष्ट्ये काय? तर हे कार्ड ४ मार्च २०१९ रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं. आता ते महाराष्ट्रात बंधनकारक करण्यात आलं आहे.
हे कार्ड कुठल्याही एसटी स्टँडवर बनवून मिळणार आहे. प्रि-पेड वॉलेटसारखं हे काम करणार असून १९९ रुपये इतकी याची किंमत असून त्यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स कायम ठेवावा लागणार आहे. यासाठी ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्जही करता येणार आहे.
हे कार्ड थेट आधारकार्डशी कनेक्टेड असल्यानं वेगळं आधार कार्ड दाखवण्याची गरज संपणार आहे. यामुळं जवळ पैसे नसले तरी तिकीट काढता येणार आहे. यामुळं तिकीटाची प्रक्रिया आणि नोंद ठेवणं सुटसुटीत होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.