Rajanand More
रोहिणी आचार्य या बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या तर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व तेजप्रताप यांच्या भगिनी आहेत.
रोहिणी यांनी नुकतीच सोशल मीडियात एका आलोक कुमार यांची एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये आरजेडीचे राज्यसभेचे खासदार संजय यादव एका बसमध्ये पहिल्या बसलेले दिसत आहेत.
पहिली सीट ही नेतृत्वासाठी असते. ते नसले तरी त्यावर बसणे योग्य नाही. कुणी स्वत: नेतृत्वापेक्षा मोठे समजत असेल, तर ती वेगळी गोष्ट आहे, असा खोचक टोला यादव यांना पोस्टमध्ये लगावला आहे.
रोहिणी यांनी ही पोस्ट करत एकप्रकारे बंडाचा पवित्रा घेतल्याची जोरदार चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे.
लालूंनी पक्षातून काढल्यानंतर तेजप्रताप यांनी संजय यादव यांचा 'जयचंद' असा उल्लेख केला होता. तसेच वडील व बंधू तेजस्वी यांना सूचक इशाराही दिला होता.
तेजप्रताप यांच्या नंतर त्यांची बहीणही मैदानात उतरली आहे. रोहिणी यांनी पोस्ट शेअर करत संजय यादव यांच्यापासून पक्षाला धोका असल्याचे सूचक संकेत दिल्याची चर्चा आहे.
यादव हे तेजस्वी यादव यांच्या गोटातील विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे तेजप्रताप आणि रोहिणी यांनी संजय यादव यांच्यावर साधलेल्या निशाण्याला महत्व प्राप्त झाले आहे.
लालूंच्या कुटुंबामध्ये कलह असल्याची चर्चाही यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे. तेजप्रताप यांना यापूर्वीच लालूंनी कुटुंबातून बेदखल केले आहे. आता रोहिणी यांच्यानिमित्ताने कलहावर शिक्कामोर्तब झाले आहे.