Amit Ujagare
जन्म दाखला हरवला, खराब झाला किंवा गहाळ झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी जन्म नोंद झाली आहे (ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका), तिथून डुप्लिकेट/प्रमाणित प्रत मिळू शकते.
जन्म झालेल्या ठिकाणच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात अर्ज करा. ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये तर शहरी भागात नगरपालिका/महानगरपालिकेत यासाठी अर्ज करावा लागेल. त्याचबरोबर ऑनलाइनसाठी आपले सरकार पोर्टलवर (aaplesarkar.mahaonline.gov.in) किंवा संबंधित महापालिका वेबसाइटवरुन देखील अर्ज करता येतो.
डुप्लिकेट जन्म दाखला काढण्यासाठी अर्जदाराचं किंवा पालकांचे ओळखपत्र (आधार, पॅन), पत्त्याचा पुरावा, रुग्णालयाचे जन्म प्रमाणपत्र किंवा जुन्या नोंदीचा पुरावा, गरजेनुसार नोटरीकृत शपथपत्र (मूळ दाखला हरवल्याचं) सादर करावं.
संबंधित जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जा. याठिकाणी डुप्लिकेट दाखल्यासाठी फॉर्म घ्या, त्यात अचूक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. त्याचबरोबर योग्य शुल्कही भरा आणि अर्ज सादर करा. या अर्जानुसार सर्व नोंदी तपासून संबंधित कार्यालयाकडून डुप्लिकेट जन्म दाखला मिळेल.
ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जन्म दाखला मिळवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करा. त्यात जन्म दाखला सेवा हा पर्याय निवडा. त्यातील तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. यासाठी ऑनलाइन शुल्क भरा, अर्ज क्रमांक जतन करा आणि स्टेटस ट्रॅक करा. डिजिटल साइन केलेला PDF दाखला तुम्हाला मिळून जाईल.
शुल्क साधारण ₹१० ते ₹५० (कार्यालयाप्रमाणे) लागू शकते. हा दाखला मिळण्यासाठी साधारण ७ ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. काही ठिकाणी लवकरही मिळू शकतो.
जर जुनी नोंद उपलब्ध नसेल तर उशिरा नोंदणी प्रक्रियेद्वारे अर्ज करावा लागतो. त्यासाठी अतिरिक्त पुरावे, शपथपत्र किंवा अधिकाऱ्यांची परवानगी लागू शकते.
जन्मतारीख, ठिकाण, पालकांची नावे अचूक द्या. अर्ज क्रमांक/पावती जपून ठेवा. अधिक माहितीसाठी स्थानिक कार्यालय किंवा अधिकृत पोर्टल तपासा. डुप्लिकेट कायदेशीरदृष्ट्या वैध असतो.