Rashmi Mane
सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा झटका बसला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली असून 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात तब्बल 15 ते 16 रुपयांची वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून ही नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि केटरिंग व्यवसायाचा खर्च वाढेल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.
कारण व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या या गॅस सिलेंडरचे दर वाढल्यास जेवणावळी, खानावळी व हॉटेलमधील खाण्याच्या पदार्थांच्या दरांवरही परिणाम दिसून येऊ शकतो.
मुंबईमध्ये 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर याआधी 1531 रुपये होता, मात्र आता या सिलेंडरची किंमत 1547 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत 1595 रुपये झाली असून चेन्नईमध्ये ती तब्बल 1754 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कोलकात्यामध्ये आता 1700 रुपये झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही दरवाढ केवळ व्यावसायिक एलपीजी सिलेंडरमध्ये झाली आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमती वाढ झालेली नाही.
त्यामुळे घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीदेखील दशहरा-दीपावलीच्या आधी झालेली ही दरवाढ लोकांच्या खिशाला चांगलीच चटका लावणारी ठरत आहे.