सरकारनामा ब्यूरो
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी ६६ वा स्मृतिदिन आहे.
१९५६ साली याच दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे त्यांच्या दिल्ली येथील राहत्या घरी निधन झाले. त्यामुळे या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' म्हंटलं जातं.
महापरिनिर्वाण दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
दर वर्षी ६ डिसेंबरला चैत्य भूमीवर देशभरातील लाखो भीम अनुयायी बाबासाहेबांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मुंबई मध्ये दाखल होतात.
पण बऱ्याच लोकांना महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ माहीत नाहीये.
परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास याचा अर्थ उलगडतो, 'निर्वाण' म्हणजे 'मुक्ती'. याचाच अर्थ 'मोक्ष' असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो. त्याचा पुर्नजन्म होत नाही.
बौद्ध धर्मातील लक्षावधी अनुयायी बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळे त्यांच्या स्मृतीदिनासाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.