Ganesh Sonawane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या 100 दिवस कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी या गटात राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
जिल्हा परिषदेचे हे यश सर्व विभागप्रमुख व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे असं आशिमा मित्तल सांगतात.
अगदी नियोजनाच्या पहिल्या दिवसापासून अंतिम टप्प्यापर्यंत अत्यंत काटेकोर नियोजन, संवेदनशील अंमलबजावणी आणि प्रभावी नियंत्रणाच्या जोरावर नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक घटकात उत्तुंग कामगिरी बजावली.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा परिषदेने दैनंदिन आढाव्याच्या माध्यमातून सर्व उपक्रमांना गती दिली. कार्यालयीन स्वच्छतेपासून ते तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेकडे झेप घेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, कार्यालयीन सुधारणा आणि तक्रार निवारण यंत्रणांपर्यंत सर्व बाबींचा समावेश या मोहिमेत करण्यात आला.
औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी स्थानिक उद्योजकांशी चर्चा, कामकाज अधिक सुलभ व्हावे यासाठी विकसित करण्यात आलेली ॲप्स, तसेच नवकल्पनांची अंमलबजावणी ही नाशिक जिल्हा परिषदेसाठी जमेची बाजु ठरली.
नवीन इमारतीचे काम सुरु असतानाही जुन्या इमारतीत आवश्यक सुविधा निर्माण करून कामकाज अविरत सुरू ठेवणे हेही प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे उदाहरण ठरले. या संपूर्ण मोहिमेची फलश्रुती म्हणजे सुसूत्र नियोजन, उत्कृष्ठ समन्वय आणि टीमवर्क यावर आधारित कार्यपद्धतीमुळे नाशिक जिल्हा परिषदेला या अभियानात उल्लेखनीय यश प्राप्त झाले.
आता पुढील मुख्यमंत्री १५० दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेचे नियोजन जिल्हापरिषदेकडून करण्यात येत आहे.