सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या मुलाची वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एन्ट्री झाली आहे.
प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
हा विजय म्हणजे प्रतीक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. त्यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना असे करण्यात आले.
जयंत पाटील यांनीही 1984 साली आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी घेत केली होती. ते तब्बल दहा वर्ष अध्यक्ष होते.
मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघ आणि राजारामबापू उद्योग समूहात लक्ष घालायला सुरुवात केली होती.
राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचा राजकारणात प्रवेश झाला आहे.
वाळवा तालुक्यातील कासेगावचे पाटील घराणे स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे घराणे म्हणून ओळखले जाते. राजारामबापूंचे वडील अनंत पाटील आणि चुलते ज्ञानू बुवा यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता.
कारखान्यावर युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटील यांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी काही कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर प्रतीक पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आणि कार्यकर्त्यांची अपेक्षापूर्ती झाली.