Deepak Kulkarni
एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना नुकतीच नागपूरमधून समोर येत आहे. विदर्भाच्या मातीत जन्मलेला, परंतु अवघ्या तिसऱ्या दिवशी अनाथ अन् पोरके केलेला एक मुलगा नेदरलँड्स देशातील हिमस्टेड शहराचा महापौर झाला आहे.
फाल्गुन यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1985 रोजी नागपुरात झाला होता. मात्र, त्यांच्या जन्मानंतर आईनं अवघ्या तीनच दिवसांत त्यांना वाऱ्यावर सोडलं. तेव्हापासून त्यांच्या नशिबी अनाथाचं जगणं आलं. फाल्गुन यांना त्यामुळे नागपूरमधील दत्तक गृहाचा आधार घ्यावा लागला.
आता नेदरलँडमधील हिमस्टेड शहराच्या महापौरपदाचा मान मिळवल्यानंतर तब्बल 41 वर्षांनी फाल्गून हे नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी त्यावेळच्या अनाथाश्रमाच्या अधीक्षिका मंगला भुसारी यांची भेट घेतली.
फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून मंगलाताईंनीच त्यांचे नाव ‘फाल्गुन’ असे ठेवले होते. या अनाथाश्रमात त्यावेळी त्यांनी एक महिना राहिल्यानंतर नेदरलॅण्डच्या एका डच दांपत्यानं त्यांना दत्तक घेतलं.
फाल्गुनला त्या डच दांपत्यानं केवळ घरच नाही तर कुटुंब,प्रेम,उच्चशिक्षण यांसह स्वतःची एक वेगळी अशी ओळखही मिळवून दिली. त्याचमुळे आज तोच एका अनाथाश्रमातील फाल्गुन नेदरलॅण्ड्सच्या हिमस्टेड या शहराचा महापौर पदावर विराजमान आहे.
भारतात परतल्यानंतर ते आजही तितक्याच निरागस भावनेनं व कोणताही राग न बाळगता आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेताना दिसून येतात.
माझ्या मनात आईविषयी कोणताही राग नसून अगदी कुणाविषयी काहीच तक्रारदेखील नाही. फक्त तुझा मुलगा सुरक्षित असल्याचं आईला सांगायचंय असं ते म्हणतात.
फाल्गुन यांचं नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जे अनाथगृह होते, तिथेच त्यांचं पालनपोषण झालं. त्यावेळी ज्या अधीक्षिकेने त्यांना जीव लावत सांभाळलं,त्यांची भेट घेत मंगला भुसारी यांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर झालेला आनंद शब्दातीत असाच होता.
नेदरलॅण्ड्सच्या हिमस्टेड या शहराचा महापौर फाल्गुन यांच्या आईचा शोध जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय घेणार आहेत.