Rashmi Mane
शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
यावर उपाय म्हणून कृषी विभागाकडून ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे.
मराठीत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
महाविस्तार एआय ॲपमधील ‘एआय चॅटबॉट’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. यामध्ये रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान माहिती आणि पिकांच्या योग्य काळातल्या पेरणी, खतवापर व कापणीबाबत सल्ला दिला जातो.
ज्यामुळे शेतकरी स्थानिक तसेच राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये पाहून उत्पादनाचे नियोजन करू शकतात.
ॲपमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि विमा योजनांचे तपशील उपलब्ध आहेत. तसेच पिकांची लागवड, खतांचा योग्य वापर, कापणी प्रक्रिया आणि जैविक शेती यावर मराठीत व्हिडिओ मार्गदर्शन देखील उपलब्ध आहे.
महाविस्तार एआय ॲपमधील अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानामुळे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करू शकतात व त्वरित उपाय मिळवू शकतात.
कृषी विभागाने सांगितले की, हे ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी तयार केले असून ते उत्पादन वाढवण्यास आणि नफा टिकवण्यास मदत करेल. एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि श्रम वाचवता येतात, तसेच आधुनिक शेती पद्धतींचा लाभ घेता येतो.