Amit Ujagare
पावसाळा सुरु झाला की, शेतीच्या मशागतीची काम सुरु होतात, त्यानंतर खतांच्या खरेदीसाठी शासकीय केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडते. सवलतीत खतांच्या खरेदीसाठी इथं अनेकदा रांगा लागतात.
पण आता या रांगांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवे ॲप विकसित केलं आहे.
या योजनेचा पायलट प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत राबवण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या परिसरातील खत विक्रेत्यांकडील उपलब्ध साठा मोबाईलवर पाहू शकणार आहे.
आवश्यक खत ऑनलाईन बुक केल्यानंतर ते पुढील तीन दिवसांसाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर राखीव ठेवले जाणार आहे. त्यामुळे खतासाठी होणारी धावपळ, रांगा आणि उपलब्धतेबाबतचा संभ्रम कमी होण्यास मदत होईल.
शेतकरी ॲपवरून खत बुक केल्यानंतर त्याला एक क्यूआर कोड मिळणार आहे. हा क्यूआर कोड खत विक्रेत्याच्या ई-पॉस मशीनवर स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्याला निर्धारित किंमतीत खत खरेदी करता येणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार असल्याने पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. सध्या या ॲपची कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असून, लवकरच ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे.
या प्रकल्पाची उपयुक्तता आणि प्रतिसाद पाहून पुढील काळात तो संपूर्ण राज्यात तसेच देशभरात लागू करण्याचा शासनाचा विचार आहे.