Amit Ujagare
महाराष्ट्र गुटखा विक्रीवर बंदी आहे, तरीही छुप्या पद्धतीनं सर्वच पान टपऱ्यांवर सर्रासपणे सुगंधी सुपारी आणि तंबाखूच्या नावाखाली गुटखा विक्री होत आहे.
गुटखा, सुगंधी तंबाखू तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी अन्न औषध मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याची माहिती दिली.
त्यानुसार राज्यात आता छुप्या पद्धतीनं गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे. बनावट सुपाऱ्या बनवून गुटखा निर्मिती होत असल्याचा खुलासा झिरवाळ यांनी केला आहे.
माणसं जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग अन् केमिकल वापरून सुगंधित केलं जात असल्याचं खुद्द मंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत सांगितलं.
अशा गुटख्यामुळे नपुसंकत्व येण्यासारखं भीषण समस्या निर्माण झाली आहे. अनेक अधिकारी यात सहभागी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
इतर राज्यांमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी देखील होत असून हे ताबडतोब बंद झालं पाहिजे यासाठी मी अधिकाऱ्यांना वारंवार बैठका घेऊन सांगितलं आहे.
गुटखा तस्करीचे मार्ग कुठले आहेत? हे एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, पण ते बंदोबस्त करत नाहीत. यावर प्राथमिक प्रतिबंध करून बघितलं पण आता मोक्का शिवाय पर्याय नाही, असंही यावेळी झिरवाळ यांनी सांगितलं.
गुटख्याच्या तस्करीत करोडोंचा व्यवसाय करणारा व्यापारी पाच लाख रुपयांचा दंड भरून सुटका करुन घेतो. पण आता याच्या तपासणीसाठी केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात खाजगी लॅब उभारण्यात येणार आहेत.
गुजरातवरून गुटख्याचा माल कसा येतो हे मला समजलं आहे. त्यामुळं गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर आता मोक्का लावण्यात येणार आहे. वेळ आलीच तर अधिकाऱ्यावरही मोक्कांतर्गत कारवाई होणार.