Rashmi Mane
गर्भवती महिला व जन्माला येणाऱ्या बालकांना पोषण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यातील लाखो महिलांसाठी संजीवनी ठरली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक अपत्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते, ज्यामुळे प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आवश्यक पोषण आणि वैद्यकीय सेवा मिळवता येतात.
योजनेत महिलांना पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रुपये तर दुसऱ्या अपत्यासाठी, जर ती मुलगी असेल, तर 6 हजार रुपयांपर्यंत मदत मिळते. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे आर्थिक सहाय्य थेट महिलांपर्यंत पोहोचते.
राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून योजना ग्रामीण भागातील आणि असंघटित क्षेत्रातील महिलांपर्यंत पोहोचवली जात आहे.
या योजनेमुळे गर्भवतींच्या तपासण्या, पोषणाचे प्रमाण आणि सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१७-१८ ते २०२५-२६ (२ जून २०२५ पर्यंत) योजनेअंतर्गत ४६ लाख २९ हजार ११९ महिलांना लाभ मिळाला असून, एकूण १,८३८ कोटी रुपये वितरित केले गेले आहेत.
वर्षानुवर्षे लाभार्थींची संख्या वाढत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून, मातामृत्यू दर आणि अल्पवजनी बाळांच्या प्रमाणात घट झाली आहे.