Amit Ujagare
फरार गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. यामुळं देशातून पळून गेल्यानंतर त्याच्यावर झालेली ही साधारण सहावी कारवाई आहे.
घायवळचा कालच पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर आज त्याची स्कॉर्पियो गाडी त्याच्या अहिल्यानगरच्या जामखेड खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.
ही स्कॉर्पियो गाडी खर्डा इथं ऊसामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी गाडी लपवून ठेवल्याच्या ठिकाणी धडक कारवाई करत ही गाडी जप्त केली.
दरम्यान, परदेशात पळून गेल्यापासून आत्तापर्यंत त्याच्यावर सहा ते सात वेळा विविध बेकायदा कृत्यांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निलेश घायवळ जेव्हा लंडनमध्ये पळून गेल्या असल्याचं समोर आलं तेव्हा पहिल्यांदा त्याच्यावर परदेशात पळून गेल्याचा गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
एकूण १० गुन्हे त्याच्यावर दाखल असून यांपैकी ८ गुन्हे हे केवळ कोथरुड पोलीस ठाण्यातच दाखल आहेत. कारण या हद्दीतच त्यानं सर्वाधिक गुन्हे केले आहेत. तर उर्वरित दोन गुन्हे हे वारजे आणि सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
कोथरुड गोळीबार, कोयता हल्ला, घरात जिवंत काडतुसं आढळली, बनावट नंबर प्लेट, पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रे सादर केली. तसंच निलेशसह त्याच्या भाऊ सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करुन घेतले, याद्वारे त्यानं खंडणी गोळा केली.
त्याचबरोबर दुसऱ्याच्या नावावर सीम कार्ड वापरणं, गुन्हेगाराला खतपाणी घालेलं अशी रील्स बनवणं, मुसा-गांजा तस्करी आणि एका कंपनीकडून तब्बल ४५ लाखांची खंडणी वसूल असे विविध १० गुन्हे त्याच्यावर नावावर दाखल आहेत.