Rajanand More
उत्तराखंडमधील आयपीएस रचिता जुयाल यांनी मागील आठवड्यात नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यावरून राज्यात राजकारण तापू लागले आहे.
रचिता यांनी पोलिस दलात 10 वर्षे सेवा केली. 2015 मध्ये उत्तराखंड केडरमधून त्यांनी आयपीएस बनत सेवा सुरू केली होती.
रचिता यांनी शुक्रवारी (ता. 30 मे) राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडे राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
एका भ्रष्टाचारी पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता, असा मोठा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गणेश गडियाल यांनी केला आहे.
प्रशासकीय हस्तक्षेपामुळे काम करण्यात अडथळे येत असल्याने रचिता यांनी राजीनामा दिल्याची चर्चाही उत्तराखंडमध्ये आहे.
रचिता यांनी राजीनामा देण्यामागे आपले वैयक्तिक कारण असल्याचा खुलासा केला आहे. प्रत्येकाची स्वप्न आणि काही आकांक्षा असतात. कुणीच अपवाद नाही. कुटुंबाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
रचिता यांची वडीलही पोलिस दलात होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांनी पोलिस दलात पाऊल ठेवले. पण दहा वर्षांतच सेवेतून निवृत्तीही घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रचिता यांचे पती यशस्वी हे फिल्ममेकर आणि डायरेक्टर आहेत. कोरोना काळात सामाजिक सेवा करत असताना दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात. यशस्वी यांचे बंधू फेमस डान्सर राघव जुयाल हे आहेत.