Amit Ujagare
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अत्यंत उच्च दर्जाची सेवा पुरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांची जबाबदारी एका मराठी व्यक्तीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमधून दररोज सुमारे ७५ लाख प्रवाशी प्रवास करतात. ३५४ किमी इतक्या मोठ्या अंतरावर दिल्ली शहरातील मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे.
दिल्ली आणि एनसीआर हे देशाच्या राजधानीचं शहर असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील तर आहेच पण या सुमारे पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या शहरातील प्रवाशांसाठी दिल्ली मेट्रो महत्वाची सार्वजनिक प्रवाशी सेवा आहे.
या दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी १३ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वाचं नेतृत्व तसंच दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या रोजच्या ७५ लाख प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी साताऱ्याचे सुपुत्र असलेले IPS संतोष चाळके यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
IPS म्हणून चाळके यांनी २२ वर्षे काम केलं असून राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये धडाकेबाज पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आहे.
तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जनतेशी थेट संवाद साधण्यात त्यांची हातोटी आहे. प्रतिनियुक्तीवर दिल्लीत त्यांनी सीबीआय, सीआयएसएफचे डीआयजी म्हणूनही त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पेलली आहे.
त्यातच आता IPS संतोष चाळके यांची दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या मुख्य सुरक्षा अधिकारपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळं देशातील कोट्यवधी लोकसंख्या असलेलं एका महानगरातील लाखो लोकांची सुरक्षा आता त्यांच्या खाद्यावर असणार आहे.
IPS संतोष चाळके यांच्या साताऱ्यात यामुळं उत्साहाचं वातावरण असून सध्या सगळीकडं आपल्या या भूमिपुत्राची चर्चा सुरु आहे.