Rashmi Mane
देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज वाढदिवस.
निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूमधील मदुराई येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. 1980 मध्ये, त्यांनी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय अभ्यासात एम फिल केले. निर्मला सीतारामन यांनी प्राइस वॉटर हाऊस कूपर्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (संशोधन आणि विश्लेषक) म्हणून काम केले आहे. तसेच 'बीबीसी वर्ल्ड'साठीही त्यांनी काही काळ काम केले आहे.
लग्नानंतर त्या लंडनमध्ये शिफ्ट झाल्या. याठिकाणी त्यांनी एका 'स्टोरमध्ये सेल्सगर्ल' म्हणूनही काम केले होते. तसेच लंडनमधील 'प्राईस वॉटर हाउस' मध्येही त्यांनी मॅनेजर पदावर काम पाहिले आहे.
सितारामण यांनी लंडनमधील कृषी अभियंता संघटनेत सहाय्यक अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. भारतात परतल्यावर त्यांनी 'सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीज'मध्ये उपसंचालक म्हणूनही काम केले आहे.
मुलीच्या जन्मानंतर त्या भारतात परतल्या त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आपल्या राजकीय कारर्किदीला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री पद भुषवले. त्यानंतर त्यांच्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्रालयाचा कारभारही त्यांना देण्यात आला. विशेष म्हणजे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळवला.
1970-71 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात अर्थ खाते स्वत:कडे ठेवले होते. त्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री नव्हत्या. पण निर्मला सीतारामन या खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.