Amit Ujagare
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली होती. यामध्ये भारताची भूमी सलग होती पण पाकिस्तान दोन भागात विभागलेला होता. याला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन भाग होते.
यांपैकी आजचा पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा तर पूर्व पाकिस्तान हा आजचा बांगलादेश आहे. या बांगलादेशच्या निर्मितीची कथा खूपच रंजक आणि निर्भयतेची आहे.
बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये या पूर्व पाकिस्तानातील नेते शेख मुजीबुर रेहमान हे प्रमुख नेते होते. बांगला मुस्लिमांच्या संस्कृती, भाषा आणि अधिकारांसाठी मोठा लढा उभा करणारे ते महत्वाच नेते होते.
रक्तरंजीत संघर्षानंतर जेव्हा बांगलादेश १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानपासून वेगळा झाला, त्यानंतर वंगबंधू म्हणून प्रसिद्ध झालेल्या शेख मुजीबूर रेहमान यांना बांगलादेशचे राष्ट्रपिताही संबोधले जाऊ लागले. मुजीबूर रेहमान हे १९७२-७५ या काळात बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बनले त्यानंतर १९७५ मध्ये राष्ट्रपती झाले.
पण जेव्हा मुजीबूर रेहमान यांच्या हातात संपूर्ण सत्ता आली त्यानंतर त्यांनी घटनादुरुस्ती करुन एकपक्षीय सत्ता स्थापन केली. त्यानंत त्यांनी माध्यमं आणि विरोधीपक्षांवर बंदीही आणली. त्यामुळं हळूहळू ते एकपक्षीय हुकुमशाहीकडे वळले.
अशा प्रकारच्या राजकीय कारभारामुळं देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, आर्थिक, समाजिक, सांस्कृतिक पिछेहाट सुरु झाली. नव्या देशातील जनतेला ज्या इच्छा-अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकत नव्हत्या. मुजीबूर रेहमान यांनी आपल्या मर्जीतील आणि नातेवाई लोकांच्याच महत्वाच्या संस्थांमध्ये नियुक्त्या केल्या. त्यामुळं भ्रष्टाचार प्रचंड वाढला.
सगळीकडं अनागोंदी कारभार सुरु झाला होता. मुजीबूर रेहमान यांनी नियुक्त कलेले त्यांचे नातेवाईक मंडळी ही स्मगलिंगमध्ये गुंतली होती. अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध दृढ वाढले त्यामुळं पैसा देश उभारणीसाठी खर्च होण्याऐवजी परदेशात वळवला जाऊ लागला.
शेवटी बांगलादेशच्या लष्करातही अस्वस्थता निर्माण होऊ लागली, शेख मुजीबूर रेहमान यांच्यावरचा लष्कराचा विश्वास कमी होऊ लागला आणि संदेह वाढायला लागला. भारतासोबत २५ वर्षांचा दीर्घ मैत्री करारही बांगलादेशच्या लष्कराला रुचला नाही. यातूनच बांगलादेशच्या लष्करात दोन गट पडले आणि ज्वालामुखी केव्हा झाला कळलंही नाही.
पुढे लष्कराकडून कट-कारस्थानाद्वारे शेख मुजीबूर रेहमान यांची हत्या करण्यात आली. बांगलादेशची निर्मिती ही पाकिस्तानला धडा शिकवण्याची भारताची विशेष रणनिती होती. त्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या इशाऱ्यालाही जुमानलं नव्हतं. लेखक धनंजय राजे यांच्या 'गाजलेल्या राजकीय हत्या' या पुस्तकातील हे संदर्भ आहेत.