Rashmi Mane
महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घेऊया कोण आहेत विजय वड्डेटीवार.
वडेट्टीवार हे मूळचे शिवसैनिक होते. त्यांनी काही काळ शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम केले आहे. मात्र, नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर राणे समर्थक असलेल्या वडेट्टीवारांनीही काँग्रेसची वाट धरली.
विजय वड्डेवार हे मूळचे चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे आहेत.
वडेट्टीवार यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यार्थी चळवळीपासून झाली. 1980 ते 1981 पर्यंत ते 'एनएसयूआय'मध्ये सक्रिय होते.
'एनएसयूआय'मध्ये सक्रिय असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सक्रिय राजकारणात आल्यानंतर विदर्भामध्ये भाजपचे कट्टर विरोधक आणि ओबीसींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
1991 ते 93 दरम्यान वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1996-98 मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. 1998 मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 मध्ये चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभेतून ते दुसऱ्यांदा विजयी झाले.
2010 मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून बहुमताने विजय मिळवला.
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 24 जून 2019 ला वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.