सरकारनामा ब्यूरो
तिरंगा आपल्या देशाची शान आहे. देशाचा ध्वज पाहिल्यावर आपली छाती अभिमानाने भरुन येते.
कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं.
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी २२ जुलै १९४७ रोजी घटनासभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार 'राष्ट्रीय ध्वज' म्हणून करण्यात आला.
आपल्या तिरंग्यात काळानुसार वेळोवेळी बदल झाले आहेत.
भारतात राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण पहिल्यांदा ७ ऑगस्ट १९०६ रोजी झाल्याचं सांगितलं जातं. हे ध्वजारोहण कोलकाता इथल्या पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) इथे झालं. त्यावेळी या ध्वजावर आतासारखेच तीन आडवे रंगीत पट्टे होते. मात्र, ते रंग लाल, पिवळा आणि हिरवा असे होते. वरच्या पट्टीवर कमळांची रांग होती तर खालच्या पट्टीवर चंद्रकोर आणि सूर्य होता.
दुसऱ्या ध्वजाचं ध्वजारोहण मादाम कामा आणि हद्दपार केलेल्या इतर क्रांतिकारकांच्या हस्ते पॅरिसमध्ये १९०७ मध्ये करण्यात आलं. या ध्वजात आणि पहिल्या ध्वजात बरंचसं साम्य होतं. वरच्या पट्टीत फक्त एक कमळ होतं तर सप्तर्षींचं प्रतीक म्हणून सात तारे होते, एवढाच फरक होता.
१९१७ मध्ये तिसऱ्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीदरम्यान हा ध्वज फडकवला. या ध्वजावर लाल रंगाच्या पाच तर हिरव्या रंगाच्या एकाआड एक अशा चार आडव्या पट्ट्या होत्या. सप्तर्षींच्या रचनेनुसार, सात तारेही त्यावर होते. डावीकडे वरच्या कोपऱ्यात युनियन जॅकही होता; तर एका कोपऱ्यात चाँद-ताराही होता.
१९२१ मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बेजवाडा (सध्याच्या विजयवाडा) इथे झालेल्या सत्रादरम्यान आंध्रच्या तरुणांनी एक ध्वज तयार करून महात्मा गांधींना सादर केला. लाल आणि हिरव्या रंगानी बनवलेला होता. हिंदू आणि मुस्लिम यांचं प्रतिनिधित्व करणारे हे रंग होते. इतर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या ध्वजात पांढऱ्या रंगाच्या पट्टीचाही समावेश करावा, तसंच राष्ट्राची प्रगती दाखवणारं फिरतं चाकही त्यात असावं, असा सल्ला महात्मा गांधींनी त्यांना दिला.
राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील महत्त्वाचं वर्ष म्हणून १९३१ कडे पाहावं लागेल. तिरंग्याला आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी ठराव संमत केला गेला. हा ध्वज सध्याच्या ध्वजाचे पूर्वरूप होता. केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्या आणि मध्यभागी फिरतं चाक, असं त्याचं स्वरूप होतं.
२२ जुलै १९४७ पासून राष्ट्रध्वजात अनेक बदल झाले; मात्र रंगांचं महत्त्व कायम राहिलं. फिरत्या चाकाऐवजी सम्राट अशोकाच्या धर्मचक्राचा समावेश करण्यात आला. अशाप्रकारे काँग्रेस पक्षाच्या तिरंग्याचा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला.